मराठी बिग बॉसच्या शोमधून कीर्तनकार शिवलीला पाटीलने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि पुन्हा ह्या शोमध्ये येणार नसल्याचंही तिने कळवलं होतं मात्र त्या पाठोपाठ एलिमीनेशन राउंडमध्ये अक्षय वाघमारे बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात बाहेर पडला. अक्षय वाघमारे घरातून एलिमीनेट झाला आणि त्याला घराबाहेर निघावे लागले तर कालच्या एलिमीनेशन राउंडमधून सुरेखा कुडची या बाहेर पडलेल्या दिसत आहेत. जो स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आणि जो आपल्या हुशारीने ह्या घरात वेगवेगळ्या टास्कला सामोरे जातो असेच स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकून राहतात हे सिद्ध झालं आहे.
सुरेखा कुडची यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री घेतली होती. घरात दाखल होताच आपल्या नावाची पाटी लावून त्यांनी “सुरेखा कुडची १०० दिवसानंतर ही पाटी उतरेल लक्षात ठेवा सगळ्यांनी” असे दणक्यात म्हटले होते. मात्र बिग बॉसच्या घरात राहून सुरेखा कुडची “इकुडची का तिकुडची” राहिल्याने प्रेक्षकांच्या आणि महेश मांजरेकर यांच्या टिकेस पात्र ठरल्या होत्या. कुठलीही ठाम भूमिका घेतली नसल्याने आणि सोनाली सोबतचा वाद वाढत चालल्याने प्रेक्षकांना त्यांच काम रुचलं नाही. आणि काल एलिमीनेशन राउंडमध्ये त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले. मात्र बाहेर जाताना महेश मांजरेकर यांनी सुरेखा कुडची यांना एक पॉवर दिली ज्यात त्यांनी तृप्ती देसाई यांना या आठवड्याचा कॅप्टन बनवले. सुरुवातीला सुरेखा कुडची यांनी बिग बॉसच्या घरात राहून फक्त दुसऱ्यांच्या म्हणण्याला हो दिला यावर महेश मांजरेकर यांनी कानउघडणी केली त्यानंतर मात्र बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये त्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेताना दिसल्या.
काल बिग बॉसच्या घरातील त्यांचा हा प्रवास संपल्यावर मीडियाला त्यांनी एक मुलाखत दिली त्यात त्या म्हणतात.. मी जशी आहे तशीच मी बिग बॉसच्या घरात राहिले.. माझं सोनालीसोबत सुरुवातीपासूनच पटलं नाही, अनेकदा आमच्यात खटके उडाले… मी शक्य होईल तसं सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते… चहा चपातीवरून देखील मला प्रेक्षकांनी फेमस केलं आहे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीतून मी जर प्रसिद्धी मिळवत असेल तर मी त्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिल… चित्रपट आणि मालिकेतून माझी प्रतिमा जशी लोकांच्यासमोर आहे तशी मी मुळीच नाही उलट सुरुवातीला मी गप्प गप्प राहणारी आहे असेच सगळ्यांना वाटले होते… तूर्तास सुरेखा कुडची यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास मात्र अर्धवटच राहिला असल्याने ही खंत त्यांना कायम राहणार आहे, हा अनुभव खूपच वेगळा होता असंही त्या म्हणाल्या.