रंग माझा वेगळा या मालिकेत काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि दीपाच्या लग्नाचा बार उडाला होता. त्यामुळे आता ही मालिका सकारात्मक दाखवली जाणार असे चित्र दिसू लागले होते. दरम्यान श्वेताने केलेल्या कृत्याचा पडदा दिपाने उघड केलेला असतो. आपल्या कौटुंबिक कलहात श्वेताचा हात होता हे दिपाला उलगडते आणि याचा जाब विचारते. श्वेतामुळे कार्तिक आपल्यापासून बाजूला गेला. आपल्या दोन्ही मुलींची तीने ताटातूट केली. या सर्वाला जबाबदार असलेल्या श्वेताला चोप देऊन दिपाने चांगलाच समाचार घेतला. मात्र श्वेताला माफ करून दिपाने इथे मात्र एक चूक केलेली आहे.
कारण या सगळ्याचा बदला आता ती पुन्हा एकदा घेणार आहे. मालिकेत कार्तिक आणि दीपा आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला जात असतात. पिकनिकमध्ये कार्तिकी टेरेसवरून खाली पडते तेव्हा कार्तिक धावत जाऊन तिला वाचवतो. यामध्ये दीपाची मैत्रीण आणि तिचा मुलगाही सहभागी होतो. मात्र कार्तिकने केलेला प्लॅन साक्षीला खटकतो. दीपा आणि कार्तिकने फिरण्यासाठी दुसरे कुठले ठिकाण निवडायला हवे होते असे ती तिला म्हणते. आता हीच साक्षी कार्तिकला रस्त्याने जाताना दिपाचा पाठलाग करताना पकडणार आहे. हे पाहून साक्षीला मात्र एक वेगळीच शंका येते. अजूनही कार्तिकचा दिपावर विश्वास नाही हे पाहुन ती याबाबत जाब विचारते. तेव्हा कार्तिक साक्षीवर चिडतो आणि तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देतो.
मालिकेतला हा नवा ट्विस्ट नेमका काय असणार आहे असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. एकीकडे श्वेता दिपाने आपल्याला मारलं म्हणून चांगलीच चिडली आहे. त्यामुळे हा नवा डाव श्वेताने तर आखला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. मालिकेचा हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना मुळीच रुचलेला नाही. आता सगळं सुरळीत चालू असताना पुन्हा कार्तिकच्या डोक्यात संशयाचे भूत कशाला असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. दीपा आणि कार्तिक एकत्र आले आहेत, त्यामुळे आता मालिकेने निरोप घेतला तरी चालेल अशा विरोधी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. कार्तिकचे हे बदललेले वागणे आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवे वादळ घेऊन येणार आहे. यामुळे मालिका अजून काही महिने आरामात चालू शकते अशा तिरसट प्रतिक्रिया मालिकेबाबत व्यक्त केल्या जात आहेत.