झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री, चिंगीचा अल्लडपणा, वर्षा आणि आईच्या गमतीजमती. रमाची आनंदीच्या संसारातली लुडबुड यामुळे मालिका विशेष रंजक झालेली आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी आहे. राघवचे तिच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच तो दुसरे लग्न करण्याचे टाळत होता. मात्र चिंगीची जबाबदारी असल्यामुळे आनंदीशी लग्न करण्यास तयार झाला. राघव आणि आनंदीचे सूर जुळु लागले असतानाच रमा मात्र आनंदीवर नाराज होती. केवळ आनंदीला दिसत असलेल्या रमाशी तिची छान मैत्री झाली आहे.

चिंगी आणि रमाच्या वाडीलांचेही तिने आपल्या बाजूने मत वळवले आहे. त्यामुळे मालिकेत सर्व काही आलबेल झाले असा समज असतानाच आता मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. रमाचा मृत्यू कसा होतो? असा प्रश्न आनंदीला पडला आहे. आजवर रमाने सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. राघव आणि चिंगीच्या आवडीनिवडी सुद्धा सांगितल्या. मात्र तिचा मृत्यू कसा झाला याबद्दल रमाने काहीच कसं सांगितलं नाही, असा प्रश्न आनंदीला सतावत आहे. ८ वर्षांपूर्वी अशी कोणती गोष्ट घडली ज्यात रमाला जीव गमवावा लागला? मालिकेतील हे गूढ आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या घटनेमुळे राघव सुद्धा कुठेतरी निघून जात असतो. तो कुठे आणि का गेला, याबद्दल त्याने आनंदीला काहीच कसं सांगितलं नाही यासरून तिला प्रश्न पडलेला असतो.

लवकरच या कथानकाचा उलगडा होणार आहे. ८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल प्रेक्षकांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नवा गडी नवं राज्य ही झी मराठीवरील एकमेव मालिका आहे जी टीआरपीच्या स्पर्धेत पुढे आहे. स्टार प्रवाहवरील सर्वच मालिकांनी टॉपच्या यादीत प्रवेश केला आहे. त्या खालोखाल १६ व्या क्रमांकावर या मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत आपले नाव नोंदवले आहे. हा टीआरपी खूप कमी असला तरी झी मराठीवरची ही सध्याच्या घडीची टॉपची मालिका ठरली आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. मालिकेचा येणारा हा ट्विस्ट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. त्यामुळे हे गूढ नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक एपिसोडची वाट पाहत आहेत.