पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर एकत्र काम करताना प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत. तब्बल सहा वर्षांच्या एकत्रित सहवासानंतर करिअरला प्राधान्य देत त्यांचा झालेला ब्रेकअप खूपच अनपेक्षित होता. टेलिव्हिजन जगातील या सुंदर जोडीचा वेगळे होण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ब्रेकअप नंतर स्वतःला सावरण्यासाठी अंकिताला बराच वेळ गेला. त्यातच जून २०२० मधील सुशांतच्या मृत्यूने ती आणखीनच खचून गेली..
मध्यंतरी कंगना राणौतच्या मणिकर्णिका झाशीची राणी या चित्रपटात झलकारी बाईची भूमिका साकारताना तिची ओळख व्यावसायिक विकी जैन सोबत झाली. कदाचित हि तिच्यासाठी पुन्हा एक काल्पनिक प्रेमकथा होती. गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करीत असलेल्या जोडप्याने उघडपणे प्रेमात असल्याचे कबूल केले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मित्राच्या लग्न समारंभात दोघे एकमेकांना किस करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आणि ते दोघे एकमेकांसोबत किती आनंदी दिसत आहेत हे बघून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता दोघांनी त्यांच्या नात्याला लग्नाच्या बेडीत अडकविण्याचा नेण्याचा निर्णय घेतला आहे.
“लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे. होय, मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे, जे लवकरच होणार आहे. मी त्याची वाट पाहत आहे. आणि मला जयपूर-जोधपूर राजस्थानी प्रकारची लग्न खूप आवडतात..” या पोस्ट द्वारे अंकिताने लग्नाची खात्रीशीर बातमी दिली आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रियकर विकी जैनसोबतचा ठरलेला विवाह सध्या मनोरंजन विश्वातील चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाबद्दलच्या अनेक अफवांच्या बातम्यांनंतर हे जोडपे या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरीही अंकिताने फक्त जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सूचित केले असून अधिकृत आमंत्रणांबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. काही वृत्त संस्थांनी १२ डिसेंबर अशी तारीख जाहीर केलेली असली तरीही अंकिता किंवा विकी यांनी यास अजूनही दुजोरा दिलेला नाही. अभिनेत्री अंकिता आणि विकी जैन यांचा आयुष्यभराचा साथीदार होण्याच्या या निर्णयाला चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.