गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने सर्वेक्षणला सुरूवात केलेली पाहायला मिळाली. सरकारने नेमून दिलेले कर्मचारी हे सर्वेक्षण करण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. अशातच अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी या सर्वेक्षणाला विरोध दर्शवलेला पाहायला मिळाला. यासंदर्भात केतकी चितळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर पुष्कर जोगचे वक्तव्यही चांगलेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. काल माझ्याघरी बीएमसीचे काही कर्मचारी आले होते त्यांनी मला जात विचारली.
त्या जर महिला नसत्या तर मी त्यांना दोन लाथा घालून हाकलून दिले असते, असे पुष्करने म्हटले होते. मात्र पुष्करच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळाला. सर्वच स्तरातून पुष्करवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच त्याचा २ फेब्रुवारी रोजी रिलीज होणारा मुसाफिरा या चित्रपटालाही बॉयकॉट करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान अभिनेते किरण माने यांनी पुष्कर जोगला त्याच्या वक्तव्यावरून एक खुलं आव्हानच दिलेलं पाहायला मिळत आहे. किरण माने हे आव्हान देताना म्हणतात की, आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय.
मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्यानं विधान केलं. “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते.त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा? मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल, खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्याकडून चार लाथा खायच्या.
बोल, आहे दम तुझ्या पार्श्वभागात? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आपलं काम इमाने इतबारे करणार्या कर्मचार्यांवर कसला माज दाखवतो तू? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा, किरण माने.