झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेला आता रंजक वळण मिळालं आहे. निशी आणि श्रीनुचे लग्न व्हावे यासाठी त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावण्याचा घाट घातला होता. मात्र निशीचे निरजवर प्रेम असल्याने ती स्वतः जीव संपवायला चालली होती. हे पाहून ओवीने तिला पळून जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आता निशीच्या अचानक पळून जाण्याने खोतांच्या घरात कल्लोळ माजला आहे. ओवी स्वतः या सर्व घटनेची जबाबदारी घेत असल्याने दादा तिच्यावर खूप चिडले आहेत. संध्याने केलेल्या कृत्याची पुनरावृत्ती इथे आपल्याच मुलीने केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मालिकेतील सर्वच पात्र त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात उतरवत आहेत. निशी, श्रीनू आणि ओवी यांची पात्र प्रेक्षकांना विशेष भावली होती. या तिघांमध्ये नीरजची एन्ट्री झाल्याने मालिकेला एक वेगळे वळण मिळाले होते. निशी आणि नीरज दोघेही पळून गेले असले तरी ते पुन्हा घरी परतणार आहेत. तेव्हा या दोघांच्या नात्याला त्यांच्या घरच्यांकडून संमती मिळणार का हे येत्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तूर्तास मालिकेत नीरजची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. नीरज हे पात्र साकारले आहे अभिनेता नीरज गोस्वामी याने. आपल्या खऱ्या नावानेच मालिकेतून त्याला ओळख दिली जात आहे. सारं काही तिच्यासाठी या मालिकेमुळे नीरज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला पण यागोदरही त्याने मराठी मालिका, वेबसीरिज मधून काम केले आहे.

याशिवाय त्याने हिंदी मालिकेतून तसेच चित्रपटातूनही काम केले होते. राम सेतू, ओके जानू अशा हिंदी चित्रपटात नीरजने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे नीरजला हिंदी सृष्टीतही ओळख मिळाली होती. झी युवा वरील श्रावणबाळ रॉकस्टार, वर्तुळ, स्त्रीलिंगी पुल्लिंग, अंडरस्टँडिंग लव्ह या मालिका वेबसिरीजमधून तो मराठी सृष्टीत झळकला होता. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर नीरजकडे काही काम नव्हते त्यावेळी त्याने स्पॅनिश भाषेचे धडे गिरवले होते. स्पॅनिश भाषेची गोडी वाढत गेल्याने तो ही भाषा इतरांनाही शिकवू लागला होता. याचदरम्यान नीरजचे अभिनय क्षेत्रात यश मिळत गेले. सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून त्याला पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर झळकण्याची संधी मिळाली.