ही घटना आहे २ ऑगस्ट १९८२ सालची. जेव्हा मनमोहन देसाई कुली चित्रपट बनवत होते या चित्रपटाचे शुटींग बंगलोरला १६ किलोमीटर दूर म्हैसूर रोडवरील युनिव्हर्सिटीत करण्यात आले होते. अभिनेता पुनीत इस्सर याचा हा पहिलाच चित्रपट, शुटिंगचा पहिलाच दिवस आणि पहिलाच सिन… आणि आपल्या पहिल्याच सिनमुळे त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. ऍक्शन सीनमध्ये अमिताभ बच्चनला मारताना पुनीतचा हात इतका जोराचा लागला की अमिताभ बच्चन शूटिंग रद्द करून कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. या काही दिवसांत त्यांचे जवळपास ४० किलो वजन कमी झाले होते. ही घटना जेवढी अमिताभ यांच्यासाठी वाईट होती तितकीच पुनीत इस्सर यांच्यासाठी देखील तितकीच वाईट ठरली.
अमिताभ बच्चन या घटनेतून सुखरूप वाचावेत म्हणून त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जाऊ लागल्या होत्या. त्यावेळी सोशल मिडियासारखी माध्यमं नसली तरी ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. पुनीतमुळे अमिताभ यांना दुखापत झाली म्हणून पुनीतचा पुढच्या तब्बल ७ ते ८ चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. ही एक चूक पुनीतचे सुरुवातीचे करिअरच बरबाद करणारी ठरली होती. याबाबत पुनीतने नेहमीच मीडियाशी बोलताना सांगितले की, मी आणि अमिताभ आम्ही दोघांनी फायटिंग करतानाचा सिन योग्य व्हावा म्हणून रिहर्सल केल्या होत्या. मात्र ऐन शूटिंगच्यावेळीच माझा हात अमिताभ यांना कसाकाय जोराचा लागला हेच मला समजले नाही. अमिताभ बच्चन ज्या वेगाने माझ्याकडे धावत आले त्या वेगाचा अंदाज न बांधता आल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. मी खूप घाबरलो होत. लोकं मलाच दोषी ठरवत होते जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी माझी बाजू ओळखली, मला समजावले, ही घटना माझ्यासोबतही घडली होती असे ते त्यावेळी म्हणाले…
जेव्हा विनोद खन्ना यांना मारताना त्यांच्याकडून चुकून डोक्याला जखम झाली होती आणि यात त्यांना आठ टाके पडले होते… असे त्यांनी मला समजावले आणि माझ्यासोबत गेटपर्यत आले जेणेकरून आमच्या दोघांत काहीच गैरसमज नाहीत हे त्यांनी लोकांना दाखवून दिले. परंतु असे असले तरी लोकं मला कामं देण्यास नकार देत होती. शेवटी महाभारत मालिकेच्या ओडिशनला मी जाण्याचे ठरवले आणि तिथे गेल्यावर दुर्योधनच्या भूमिकेबाबत माझ्या नावाचा विचार करण्यात आला. अनेक प्रयत्नांनंतर पुनीत यांना महाभारत मालिकेत अभिनयाची संधी मिळाली होती. आपल्या आयुष्यात घडलेल्या या एका घटनेची खंत त्यांना आजही वाटत आहे. ते नेहमी कुठल्याही शोला गेले की या चुकीबाबत नेहमीच दिलखुलास बोलताना पाहायला मिळाले. महाभारत या मालिकेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर पुनीत इस्सर यांनी साकारलेली दुर्योधनची भूमिकाही खूप चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या भारदस्त शरीर यष्टीमुळे त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले.
दादागिरी, रेफ्युजी, रेडी, सन ऑफ सरदार, बॉर्डर सारख्या अनेक हिट चित्रपटातून त्यांच्या अभिनयाला वाव मिळत गेला. मधल्या काळात अनेक टीव्ही मालिकांमधूनही ते प्रेक्षकांसमोर येत राहिले. आपल्या आयुष्यात अनावधानाने घडलेली एक चूक आपले आयुष्य किती बदलू शकते याचा अनुभव त्यांनी घेतला होता त्याचमुळे आजवरच्या त्यांच्या इंटरव्ह्यूमधून त्यांनी नेहमीच संयमी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळतात. पुनीत इस्सर लवकरच द कश्मीर फाइल्स या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचे दिग्दर्शक असून पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत पुनीत इस्सर महत्वाची भूमिका बजावणार आहेत हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज होणार असे सांगितले होते मात्र संकटकाळामुळे तो थेटरमध्ये कधी येईल हे अजून गुलदस्त्यात आहे.