महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ही कलाकार मंडळी आता पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका आपल्याला ९० च्या दशकात घेऊन जाते. ज्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये संगणक युग सुरू झाले. त्या काळच्या काही गमतीजमती मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतीच मालिकेत प्राजक्ता माळीची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. प्राजक्ता कम्प्युटर ट्रेनर म्हणून या कर्मचाऱ्यांना त्याचे धडे देत आहे.

अशातच ९० च्या दशकाला उजाळा मिळावा म्हणून प्राजक्ताने श्रीदेवीचा गेटअप सुद्धा केलेला पाहायला मिळाला. सोबतच ९० च्या दशकातील काही आठवणी म्हणून ही कलाकार मंडळी आपले त्याकाळचे फोटो शेअर करताना दिसली. मालिकेमुळे सुरू झालेला हा ट्रेंड आता राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलाच प्रचलित झालेला पाहायला मिळाला. चक्क राज ठाकरे यांनी देखील ९० च्या दशकातील आपला फोटो शेअर केला. कलाकार पृथ्वीक प्रतापने तर आपला फोटो सापडत नाही म्हणून, त्या काळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोधाशोध सुरू केली. त्यात त्याला आई बाबांनी लिहिलेली काही खास पत्रं सापडली. ही पत्र वाचून पृथ्वीक मात्र भावुक होऊन गेला. या पत्रांची आठवण सांगताना पृथ्वीक म्हणतो की, २ एप्रिल २०२३ ला ‘पोस्ट ॲाफिस उघडं आहे’ चा शेवटचा भाग प्रसारित झाला.

त्या निमित्ताने १९९७ सालचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झालेला. आणि आज दुपार पर्यंत खूप शोधा शोध करुनही मला १९९७ सालचा माझा एकही फोटो मिळाला नाही. पण एक अत्यंत महत्त्वाची वस्तू सापडली ती म्हणजे ‘माझ्या वडिलांनी माझ्या आईला लिहीलेली पत्र’. १९९३ ची ही पत्र, बाबाला कर्करोग असल्यानं तो उपचारासाठी मुंबईच्या एका इस्पितळात ॲडमिट होता. अंधेरीत आमच्या नातेवाईकांकडे बाबा महिना दोन महिना राहिला होता. नातेवाईकांवर जास्त भार नको म्हणून आई माझ्या वडिलांपासून बऱ्यापैकी लांब राहत होती. कधी तिच्या आई वडिलांकडे सूरतला, कधी सासू सासऱ्यांकडे गावी. कधी भावाकडे, कधी पुण्याच्या भाड्याच्या घरात आणि या धावपळीत २ आठवड्यातून एकदा दोनदा त्यांची भेट होत असे.
पण त्यांची एकमेकांसाठीची काळजी, प्रेम, माया आणि सगळ्या सगळ्या भावना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा जो होता तो म्हणजे ‘पत्र’. ३ एप्रिल २०२३ ला सगळी जुनी पत्र जी आई बाबाने एकमेकांना लिहीली होती ती पहिल्यांदा वाचली. डोळे पाणावले, थोडा स्तब्ध झालो, कधी चेहऱ्यावर स्मित आलं कधी अगदीच गहिवरून आलं. सगळी पत्रं वाचून काढली, सगळे क्षण खऱ्या अर्थाने त्या त्या काळात जाऊन अनुभवले, जगलो. पुढे अल्पावधीत बाबा निधन पावला आणि पत्रव्यवहार कायमचा थांबला. सगळा पसारा आवरून शांत बसलो असताना एक गोष्ट लक्षात आली. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी ते जास्तीत जास्त मेंदू पर्यंत पोहोचेल, पण पत्रांसारखं मनाचा ठाव कधीच घेऊ शकणार नाही. पोस्ट ॲाफिस उघडं आहेच्या निमित्ताने पोस्टाच्या जवळ जाऊ शकलो आणि पत्रांचं महत्त्व समजू शकलो.