आज अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत. अशातच आता प्रसादला प्रसिद्ध दिग्दर्शकाने एक खास सरप्राईज देखील दिलेलं पाहायला मिळत आहे. हे खास सरप्राईज म्हणजेच प्रसादची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट आहे. आजवर नेते, अभिनेते यांच्यावर बायोपिक बनवण्यात आल्या आहेत. मराठी सृष्टीत देखील सावरकरांवर बायोपिक यावा अशी विजू माने यांची ईच्छा आहे. या नवीन प्रोजेक्टची घोषणा त्यांनी प्रसादच्या वाढदिवसाच्या दिवशी केली आहे. याच निमित्ताने विजू माने आणि प्रसादची भेट झाली.
भेटीत प्रसादच्या हातात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेली एक सीडी कव्हर दिली होती. दोघांचा एक फोटो विजू माने यांनी शेअर केला आणि त्याला कॅप्शन देताना म्हटले की, तुझ्या हातात असलेल्या सीडी कव्हर वर जो फोटो आहे तो रोल तू करणार. तो सिनेमा मी दिग्दर्शित करणार हे विधीलिखित लवकरच प्रत्यक्षात येवो ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याआधी एक जोरदार मॅच प्रॅक्टिस होईलच. यातूनच विजू माने यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजू माने यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षीचा पांडु हा त्यांचा दिगदर्शीत केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरगच्च कमाई करताना दिसला. स्ट्रगलर साला या त्यांच्या वेबसीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे.
कुशल बद्रिके आणि विजू माने यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. स्ट्रगलच्या काळापासून दोघांनी एकमेकांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळे आपल्या बहुतेक चित्रपटातून त्यांनी कुशलला काम मिळवून दिलं आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटांनी प्रसादला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका प्रसादने साकारावी अशी विजू माने यांची इच्छा आहे. चित्रपटाची घोषणा करताच चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात कधी होणार आणि चित्रपटाचे नाव काय असणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रोजेक्ट मधून या अनोख्या भूमिकेत प्रसादला पाहायला प्रेक्षकही आतुर झालेले आहेत.