झी मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका आणि नवीन शो दाखल होत आहेत. बहुतेक मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कलाकारांनी एकमेकांना भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच मन उडू उडू झालं या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कलाकारांनी एकत्र येऊन एक छानशी सेन्डऑफ पार्टी अरेंज केली होती. हृता दुर्गुळे तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने मन उडू उडू झालं ही मालिका आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाला राम राम ठोकला आहे. तर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

झी मराठी वाहिनीवर दोन नवे रिऍलिटी शो दाखल होत आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स येत्या २७ जुलै पासून बुधवार ते गुरुवार रात्री ९.३० वाजता. आणि बस बाई बस २९ जुलै पासून रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित केले जात आहेत. त्यामुळे किचन कल्लाकार आणि बँड बाजा वरात हे दोन्ही शो शेवटच्या टप्प्यावर असलेले पाहायला मिळत आहे. किचन कल्लाकारच्या टीमने आज अखेरच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण केले. या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत काही राजकीय मंडळी देखील हजेरी लावताना दिसली होती. संकर्षण कऱ्हाडेचे सूत्रसंचालन, प्रणव रावराणेने निभावलेला शेठ, प्रशांत दामले यांचे परीक्षण आणि जयंती कठाळे यांचे मार्गदर्शन या शोमध्ये प्रेक्षकांनी अनुभवले.

सेटवर आज अखेरचे शूट होणार म्हणून प्रणव रावराणे याने भावनिक होऊन पोस्ट लिहिली आहे. या शोने शेठला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली होती, मात्र आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. ‘शेठची पेठ बंद झाली म्हणत प्रणवने किचन कल्लाकारचा अनुभव खूप सुंदर होता असे म्हटले आहे. रोज झगमगणारा आणि ऊर्जा देणारा आमचा हा सेट आता मात्र उजळणार नाही. नवीन काम करतच असतो आपण पण तुला मात्र विसरणार नाही.’ मालिकेच्या संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं त्याबद्दल प्रणवने टीमचे आभार मानले आहेत. ज्यांच्या मनोरंजनासाठी हा सगळा अट्टाहास केला त्या प्रेक्षकांचेही त्याने आभार मानले.
असं तुमचं मनोरंजन मी करत राहीन याच पोजिटिव्ह नोट वर रजा घेतो भेटुयात लवकरच. तोवर कधी भेटलो तर नक्की हक्काने हाक मारा ‘ओ शेठ’ म्हणून. प्रणव रावराणे याने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. अगदी सहाय्यक अभिनेता ते मुख्य अभिनेता अशी मजल मारत तो मराठी रसिकांच्या मनात जागा बनवत आहे. त्याने साकारलेला शेठ शोमध्ये धमाल उडवताना दिसला. सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना वेगवेगळे टास्क देऊन तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. हा शो संपला असला तरी प्रणव तितक्याच उत्स्फूर्तपणे एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच येईल.