महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी आणखी एक नविन मराठी वाहिनी येत्या १७ ऑक्टोबर पासून टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रात दाखल होत आहे. या नव्या वाहिनीचे नाव आहे सन टीव्ही मराठी सोहळा नात्यांचा. या वाहिनीवर नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी भन्नाट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. दसरा ते दिवाळी या कालावधीत हजार प्रेक्षकांना तब्बल २ कोटींची रोख बक्षिसं मिळण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वाहिनीच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत.
सन टीव्ही मराठी या नव्या वाहिनीवर सोमवार ते शनिवार नव्या मालिकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता “नंदिनी” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ७.०० वाजता “सुंदरी” ही मालिका सोम- शनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आस्ताद काळे अभिनित “जाऊ नको दूर.. बाबा” ही मालिका, रात्री ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर रात्री ८.०० वाजता “आभाळाची माया” ही मालिका दाखल होणार आहे, या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या अगोदर त्याने जीव झाला येडा पिसा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आभाळाची माया या मालिकेत छाया सांगावकर ही अभिनेत्री आईच्या भूमिकेत दिसणार आहे. रात्री ८.३० वाजता “कन्यादान” ही मालिका प्रक्षेपित होणार आहे अभिनेते अविनाश नारकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यानंतर रात्री ९.०० वाजता “संत गजानन शेगावीचे” ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत अभिनेता “अक्षय टाक” हा गजानन महाराजांची भूमिका बजावताना दिसणार आहे. या मालिके अगोदर अक्षयने बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत तात्यांची भूमिका गाजवली होती. बायको अशी हवी या मालिकेत देखील तो सहाय्यक भूमिकेत दिसला मात्र या मालिकेतून प्रथमच तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे संध्याकाळी ६.३० ते ९.०० या कालावधीत या वाहिनीवर तब्बल ६ मालिकांची मांदिआळी पाहायला मिळणार आहे. या सहा मालिकेतून वाहिनीने बऱ्याचशा नव्या जुन्या कलाकारांना अभिनयाची संधी दिली आहे. अध्यात्मिक मालिके सोबतच गावरान ठसकेबाजपणा ते आधुनिक संस्कृतीची सांगड घालत या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या नव्या वाहिनीच्या नव्या दमातील मालिका धमाकेदार स्पर्धा प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील यात शंका नाही. नव्या वाहिनीसाठी आणि त्यात झळकणाऱ्या सर्व कलाकारांसाठी त्यांची ही वाटचाल यशस्वी होवो हीच एक सदिच्छा!!!