नवरी मिळे नवऱ्याला हा सुपरहिट चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सचिन पिळगांवकर यांनी केले होते. सुप्रिया सबनीस आणि निवेदिता जोशी या दोघींचा हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट ठरला होता. सचिन, सुप्रिया, संजय जोग, निवेदिता जोशी, अशोक सराफ, नीलिमा परांडेकर, जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, दया डोंगरे यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी स्वरबद्ध केलेलं ‘निशाणा तुला दिसला ना’ या गाण्यात अशोक सराफ आणि नीलिमा परांडेकर एकत्रित झळकले होते. अशोक सराफ यांच्यासोबत अनेक नायिकांनी काम केले आहे त्यात नीलिमा यांचे देखील नाव घेतले जाते.

नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. या काळात नीलिमा परांडेकर मराठी सृष्टीत फारशा दिसल्या नाहीत. त्यामुळे त्या काय करतात याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. नीलिमा परांडेकर यांनी १९८४ सालच्या माहेरची माणसे या चित्रपटातही काम केले होते. मराठी चित्रपटात कमी काम केलेल्या नीलिमा परांडेकर यांनी पुढे जाऊन हिंदी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. शॉर्टकट रोमिओ, एक घर बनाउंगा, बिट्टी बीजनेसवाली, ढुंढ लेगी मंजिल हमें अशा हिंदी मालिकेतून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. एक घर बनाउंगा या मालिकेत त्यांनी साकारलेली मंगलादेवी शशिकांत गर्गची भूमिका खूपच गाजली होती. एक दोन मराठी चित्रपटातून झळकलेल्या बऱ्याचशा नायिका हिंदी सृष्टीत नाव कमावताना दिसल्या आहेत.

मराठी सृष्टीत खूप कमी विचारणा होत असल्याने बहुतेक कलाकार मंडळी हिंदी मालिकांचा पर्याय निवडतात. कालांतराने निशिगंधा वाड, निवेदिता सराफ, निना कुलकर्णी यांनी सुद्धा हिंदी मालिकांचा पर्याय निवडला होता. त्यानंतर त्या पुन्हा मराठी मालिकांकडे वळाल्या. चरित्र अभिनेत्री तसेच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळत गेल्याने नीलिमा यांनी हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. कधीकाळी अशोक सराफ यांची नायिका होण्याचा मान त्यांनी पटकावला. निशाणा तुला दिसला ना या अजरामर गाण्यामुळे त्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात निश्चितच राहणार आहेत. पुढे जाऊन त्यांनी मराठी सृष्टीतही पुनःपदार्पण करावे अशी रसिकांची एक माफक अपेक्षा आहे. अशी संधी मिळाल्यास त्या नक्कीच या गोष्टीचा विचार करतील. त्यांच्या हिंदी सृष्टीतील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!