बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मुंबईत आलिशान बंगला घेतला त्यावेळी तो चांगलाच चर्चेत आला होता. १९९९ साली सरफरोश चित्रपटातून नवाजुद्दीनने बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. पीपली लाइव, गैंग्स ऑफ वासेपुर, लंच बॉक्स, किक, बजरंगी भाईजान, मंटो आणि ठाकरे अशा चित्रपटातून नवाजुद्दीनला अमाप यश मिळाले. आता मी छोट्या छोट्या भूमिका करणार नाही हे त्याचे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी त्याच्या डोक्यात हवा गेली असे म्हटले जात होते. मात्र नवाजुद्दीन खऱ्या आयुष्यात कसा आहे हे त्याच्याच पत्नीने मिडिया समोर खुलासा केला आहे. नवाजुद्दीन आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आलियाला जेवायला दिलं जात नाही. एका खोलीत बंद करून ठेवलंय, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत नाही असे आरोप तिने नवाजुद्दीनवर लावले आहेत. नुकतेच सेलिब्रिटी वकील रिझवान सिद्दीकी यांनी आलियाची बाजू मांडताना म्हटले आहे की, आलिया नवाजुद्दीनची पत्नी गेल्या काही वर्षांपासून दुबईत राहत होती. तिथे नवाजुद्दीन आपल्या मुलांना शिक्षण देत आहे. त्यांच्या देखरेखेसाठी आलियाला सोबत पाठवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च देत नाही. जवळ काहीच पैसे नसल्याने आलिया मुंबईत परतली होती. मात्र नवाजुद्दीनच्या घरच्यांनी तिला घरात घेण्यास नाकारले होते. आलिया गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलांसोबत एका बंदिस्त रूममध्ये राहत होती.
तिला बाहेरून जेवण मागवावे लागत होते. त्यानंतर सिक्युरिटी गार्डकडून बाहेरचे जेवण येणे सुद्धा बंद झाले, तेव्हा आलियाच्या सासूने घरातले जेवण देऊ केले. आलिया आपली सून नाही असे म्हणत तिच्या सासूने घरात घेण्यास नकार दिला होता. तिचे दुसरे अपत्य हे नवाजुद्दीनचे नाही असे म्हटले होते. दरम्यान आलियावर त्याचवेळी ट्रेस फाईलची केस लावण्यात आली, मात्र एवढ्या कमी कालावधीत पोलिसांनी यावर कारवाई कशी केली असा प्रश्न तिच्या वकिलांना पडला आहे. या केसची प्रोसेस वेळखाऊ असते, त्यामुळे वकिलांना याबाबत शंका आली आहे. आलियाचे वकील नवाजुद्दीनची बाजू ऐकण्याच्या तयारीत आहेत मात्र नवाजुद्दीनने अजूनही यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचा वाद इस्टेटीच्या कारणातून होत असल्याचे म्हटले गेले, मात्र हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे आहे.
आलियाने यावर आता उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. तिचे म्हणणे आहे की आमची मुलगी जोहरा अवघ्या १३ वर्षांची आहे. ती आता वयात येत आहे. त्यामुळे मला तिची काळजी वाटते. मात्र नवाजुद्दीन तीची अजिबात काळजी घेत नाही. जोहराला तो कोणासोबतही पाठवतो. मेल मॅनेजर सोबत तिला ट्रिपवर पाठवले होते. वयात आलेल्या मुलीला असं कोणाबरोबर पाठवणं मला चुकीचं वाटतं, ही गोष्ट त्याला गंभीर वाटत नाही का? नवाजुद्दीनच्या घरची मंडळी मला मारतात. ढोल वाजवतात तसं ह्या घरात महिलांना वागवलं जातं. मी ह्या विरोधात आवाज उठवला आहे त्यामुळे मला अशी वागणूक मिळते असे आलियाचे म्हणणे आहे. दरम्यान नवाजुद्दीनने या प्रकरणावर सध्या तरी मौन बाळगलं आहे.