श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवा गडी नवं राज्य ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी असते. डीलीव्हरीच्या वेळी रमा हे जग सोडून जाते. रमा आणि राघव दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही, फक्त चिंगीच्या जबाबदारीमुळे राघव दुसरे लग्न करण्यास तयार होतो. आनंदी सोबत लग्न झाल्यावर राघव तिला मनापासून स्वीकारायला तयार नसतो. शिवाय आनंदीने रमाच्या आठवणींना कपाटाला हात लावू नये अशी सक्त ताकीद राघवने दिलेली असते. मात्र यातूनही प्रेमळ आनंदी चिंगी आणि राघवचे मन हळूहळू जिंकताना दाखवली.
सुखी संसारात जेव्हा आनंदीला रमा दिसू लागल्यावर ती आपल्या संसारात लुडबुड करते असे आनंदीला सारखे वाटते. रमा कायमची निघून जाण्यासाठी आनंदी अनेक उपाययोजना करते. अशातच आता रमाशी तिची छान मैत्री झालेली आहे. मालिकेचे आतापर्यंतचे कथानक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ठरले. मात्र आता नवीन आलेल्या ट्रॅकमुळे आनंदी बाजूला पडलेली पाहायला मिळत आहे. राघव सतत रमाचा विचार करतोय, तर रमा देखील राघवची चौकशी करतेय. दोघांच्या भेटीतला मधला दुवा म्हणजेच आनंदी आता या दोघांच्या जवळीक मुळे चिंतेत पडली आहे. आता तर रमाने राघवसाठी दडपे पोहे सुद्धा बनवले आणि याबदल्यात राघवने रमासाठी साडी आणली. मालिकेतून चाललेला हा बदल प्रेक्षकांना मात्र मुळीच रुचलेला नाही.
नवा गडी नवं राज्य या मालिकेचे संवाद लेखन प्रल्हाद कुडतरकर याने केले आहे. प्रल्हाद उत्तम अभिनेता तर आहेच, शिवाय तो उत्तम संवाद लेखक सुद्धा आहे हे आता मालिकेतून दिसून आले. रात्रीस खेळ चाले या मालिकेत त्याने पांडूचे पात्र साकारले होते. पांडूच्या तोंडी असलेला इसरलंय हा डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रल्हाद प्रकाशझोतात आला. मात्र आता नवा गडी नवं राज्य मालिकेचे लेखन करताना प्रल्हाद काहीतरी इसरतोय अशी गत झालेली पाहायला मिळत आहे. मालिकेतली रमा कुठल्याही वस्तूला स्पर्श करत नव्हती. मात्र आता ती सर्रासपणे कुठल्याही वस्तूला हात लावताना दिसते. एवढेच नाही तर दडपे पोहे झाकून ठेवलेली प्लेट सुद्धा ती हाताने उचलते.
मालिकेचा लेखक आता या गोष्टी विसरला आहे का याची आठवण प्रेक्षक करून देत आहेत. मालिकेचा हा ट्रॅक पाहून प्रेक्षक उलटसुलट प्रतिक्रिया देखील देत आहेत. मात्र आता मालिकेत लवकरच सकारात्मक बदल झालेले दिसणार आहेत. रमा आता लवकरच आनंदीचा निरोप घेणार आहे. राघव, चिंगी, आई, वर्षा हे सगळे एकत्र पाहून रमाला खूप आनंद होतो. हे पाहून ती तुमच्या संसारात लुडबुड करणार नाही असे म्हणत आनंदीला निरोप देणार आहे. यानंतर जर रमा खरंच त्यांच्यातून निघून गेली तर मालिकेतून काय दाखवले जाईल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याचा उलगडा पुढील काही भागातून लवकरच होईल अशी आशा आहे.