मुलगी झाली हो मालिकेत अभिनेते किरण माने यांनी विलास पाटीलची भूमिका साकारली होती. राजकिय भाष्य केल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते. त्यामुळे मालिके विरोधात किरण माने यांच्या समर्थकांनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला. मालिकेच्या शूटिंगला मी अगदी वेळेत जात होतो, सगळ्यांशी मी चांगलं वागत होतो. असे म्हणणाऱ्या किरण यांच्या विरोधात आता त्यांच्या सहकलाकारांनी मौन सोडलं आहे. मालिकेचे चित्रीकरण वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामस्थांनी मालिकेचे चित्रीकरण थांबवले, अशी चर्चा जोर धरताना दिसली. परंतु ग्रामस्थांनी मालिकेच्या टीमची बाजू ऐकली आणि चित्रीकरण पूर्ववत सुरळीत सुरू झालं असल्याचे सांगण्यात आले आहे. मालिकेच्या चित्रीकरणात आता कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही.
आम्ही छान शूटिंग करतोय असे मालिकेच्या कलाकारांनी म्हटले आहे. मात्र किरण माने यांचेच वागणे चांगले नसल्याचा खुलासा देखील या कलाकारांनी केलेला आहे. किरण माने मालिकेच्या सेटवर गैरवर्तवणुक करत होते. याबाबत त्यांना तीन वेळा बजावले देखील होते असे अभिनेत्री शर्वानी पिल्लई यांचे म्हणणे आहे. सविता मालपेकर म्हणाल्या की, माझ्याशी ते वाईट वागू शकले नसते पण इतर जे कलाकार होते त्यांच्यासोबत ते चांगला वागत नव्हते. त्याचं नेहमी म्हणणं असायचं की मी आणि माझ्यामुळे सीरिअल चाललीये. मीच या सिरीयलचा हिरो आहे, मी कोणालाही मालिकेतून काढू शकतो. सीरिअलला हिरो हिरोईन नाहीत मीच खरा हिरो आहे. राजकारण आणि मालिकेचा काडीचा संबंध नाही आणि त्यांनी एकदम चुकीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष हिने म्हटले की, मी या मालिकेत त्यांच्या मुलीची भूमिका केली आहे. मालिकेत सुरुवातीला मी दाखल झाले तेव्हा किरण माने माझ्याशी बोलत नव्हते. त्यानंतर सेटवर आपण बाप लेकीच्या नात्यासारखं राहायचं असं ते म्हणाले. पण नंतर त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली, माझ्या वजनावरून ते मला बोलू लागले. बरेच अपशब्द त्यांनी माझ्यासाठी उच्चारले, त्यांना जे बोलायचं होतं ते मला कळत नाही असं ते समजायचे. पण हे टोमणे माझ्यासाठीच असायचे हे मला कळायचं, कारण ते उघडउघड तसंच बोलायचे. किरण माने यांनी मला सांगावं की जर तुम्ही मला तुमच्या मुलींसारखं मानता तर कुठला बाप आपल्या लेकीला असे अपशब्द वापरतो?
सतत मनस्ताप मानसिक त्रास देणं, मी कोणाच्यातही फारशी मिसळत नाही मग मलाच तुम्ही का टोमणे मारायचे हे मला त्यांना विचारायचं आहे. स्वताला हिरोईन समजतेस का? असेही ते म्हणाले होते. गेले वर्षभर त्यांच्या गैरवर्तवणुकीमुळे निर्मात्यांनी त्यांना बजावलं आहे. दरम्यान मालिकेचं शूटिंग जर बंद झालं तर जवळपास शंभर लोकांचा रोजगार बंद पडणार आहे. गुळुंब गावातील काही स्थानिकांना देखील या मालिकेमुळे रोजगार मिळाला आहे. ती माणसं सुद्धा आज रस्त्यावर येऊ शकतात. आम्ही आमची बाजू अगदी शरद पवार यांच्यापर्यत पोहोचवली आहे. त्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा होता तो प्रॉडक्शन हाऊसने घेतला असून मालिका पूर्ववत सुरू राहणार असल्याचे या कलाकारांनी सांगितले आहे.