काही दिवसांपूर्वीच मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजसचा त्याची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा पार पडला. त्यामुळे काही दिवसांनी लग्नही होईल या विचाराने आता जबाबदाऱ्या अधिक वाढल्यामुळे मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाचे औचित्य साधून सूचना वजा जबाबदारी घेणारे पत्र लिहिलेले पाहायला मिळत आहे. या पत्रात मृणाल कुलकर्णी म्हणतात की, प्रिय विराजस अनेक वर्ष आपण (म्हणजे आम्ही दोघे जास्त) तुझ्या या वाढदिवसाची वाट पहात होतो. कारण काहीही ठरवायचं असलं तरी २०२२ फेब्रुवारी नंतर असंच तुझं उत्तर असायचं. बरं झालं या तारखेआधीच तू काही गोष्टी ठरवून टाकल्यास (विशेषतः लग्न).
काही महत्त्वाच्या पूर्ण करतो आहेस (नवीन नाटक) आणि काही सुरू केल्या आहेस. (तुझा पहिला चित्रपट) आता या वाढदिवसा पासूनच्या वर्षात अनेक वेगळ्या गोष्टी घडतील. आयुष्यात अनेक सुंदर बदल होतील. लग्न होईल, जबाबदारीही वाढेल. आम्हाला खात्री आहे की या नव्या पर्वात ही तू नेहेमीच्या आत्मविश्वास आणि तळमळीने काम करशील. मेहेनती आणि समजूतदार तर तू आहेसच त्यामुळे आम्हाला तुझे कौतुक आहे आणि खात्रीही ! छान रहा, काळजी घे! तुझ्या आयुष्यातल्या या महत्वपूर्ण वर्षासाठी तुला खूप शुभेच्छा आणि प्रेम, आई बाबा. ताक: तू नसताना तुझी खोली लख्ख आवरण्याची संधी मी आजही सोडलेली नाही. मानसिक तयारी नी ये! माझा होशील ना या मालिकेतून विराजसने अभिनेता म्हणून छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते.
आई मृणाल सोबत तो चित्रपटासाठी सहदिग्दर्शन करताना दिसला होता. मात्र आगामी चित्रपट व्हीकटोरियाच्या माध्यमातून तो प्रथमच दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत आले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल अशी अपेक्षा आहे. विराजस हा मल्टी टॅलेंटेड अभिनेता आहे. बोलक्या बाहुल्यांचा खेळ, मॅजीशीयन यासोबतच नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा क्षेत्रात सहजतेने वावरताना दिसतो. याच अनुषंगाने मृणाल यांनी विराजसचे कौतुक करत इथून पुढेही अधिक जबाबदाऱ्या पेलशील असा विश्वास व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.