आई कुठे काय करते मालिकेला धक्कादायक वळण आले असून अरुंधती आणि अनिरुद्ध घटस्फोट घेताना दिसत आहे. त्यामुळे अरुंधती अनिरुद्धचे घर सोडून तिच्या आईच्या घरी राहायला गेली आहे. मालिकेतील अरुंधतीची होणारी घालमेल दिग्दर्शकाने सुरेख दर्शवली आहे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने आपल्या अभिनयाने ती चोख बजावली आहे. त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अरुंधती आता आपले आयुष्य नव्याने सुरू करणार आहे त्यामुळे मालिकेत पुढे काय काय ट्विस्ट पाहायला मिळणार याची उत्सुकता आहेच. आज मालिकेतील अरुंधतीच्या आईची भूमिका ज्यांनी साकारली आहे त्या ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात…
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “मेधा जांबोटकर”. मेधा जांबोटकर या हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून जास्त परिचयाच्या आहेत. ” ये रिश्ते है प्यार के ” या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कावेरी सिंघानिया उर्फ भाभी माँ साकारली होती. भाभीमाँ च्या भूमिकेने त्यांना भाभीमाँ म्हणूनच हिंदी सृष्टीत ओळखले जाते हे विशेष. “ये रिश्ता क्या केहलाता है” ही आणखी एक हिंदी मालिका त्यांनी साकारली होती. मेधा जांबोटकर या दिवंगत अभिनेत्री “मनोरमा वागळे” यांच्या कन्या आहेत. मनोरमा वागळे या मराठी सृष्टीतील खाष्ट सासू, विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यासारख्या कलाकारांसोबत विविधांगी भूमिका साकारल्या.
मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या “सुमती तेलंग” या नावाने ओळखल्या जात. बालपणापासूनच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना ज्येष्ठ पार्श्वगायक आर एन पराडकर यांच्याकडे सुगम आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पुढे गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. नाट्य आणि संगीत समीक्षक मनोहर वागळे यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या आणि सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या. गंमत जंमत, आम्ही दोघे राजारानी, गडबड घोटाळा, सगळीकडे बोंबाबोंब, उंबरठा, आत्मविश्वास, घरजावई, राजाने वाजवला बाजा या सारख्या मराठी चित्रपटासोबत “आगे कि सोच” सारखे काही निवडक हिंदी चित्रपट त्यांनी साकारले होते. आपल्या सहकलाकारांना नेहमी आपलेसे करणाऱ्या, मिश्किल स्वभावाच्या मनोरमा वागळे यांनी २००० साली मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.