जवळपास पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे “राजशेखर”. जनार्दन गणपत भूतकर हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. १९५८ साली भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टरची छोटी भूमिका रंगवली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची हीच सुरुवात होय.
त्यानंतर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते भालजींच्या कंपनीत दाखल झाले. त्यानंतर ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ‘साधी माणसं’ (१९६५) या भालजींच्याच चित्रपटात त्यांनी फक्कडराव ड्रायव्हरची भूमिका केली तसेच, या चित्रपटाचे साहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. ही भूमिका लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. मराठी चित्रपट सृष्टीतला प्राण अशी ओळख त्यांना मिळाली मात्र खलनायक दिसावा म्हणून प्राण यांच्यासारखा मेकअप करायची त्यांना कधीच गरज पडली नाही कारण डोळे थोडे मोठे केली की राजशेखर यांच्या नजरेत खलनायकाचा करारीपणा लगेचच दिसून यायचा. याच कलागुणांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून शिव्यांची लाखोली वाहिली जायची मुळात प्रेक्षकांच्या शिव्या हिच माझ्या अभिनयाची पावती असे ते म्हणायचे. ‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (१९८२), ‘जोतिबाचा नवस’ (१९७५), ‘वारणेचा वाघ’ (१९८४) अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला.
याच दरम्यान ‘संगोळी रायण्णा’ या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला, तसेच ‘दो ठग’, ‘नेत्रहीन साक्षी’, ‘दो छोकरी’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. बाळासाहेब ठाकरे आणि राजशेखर यांच्यात मैत्रीचे संबंध होते त्यामुळे राजशेखर यांनी शिवसेना पक्षाचा प्रचार केला होता मात्र राजकारणात जायचं नाही कारण तो आपला पिंड नाही असे त्यांचे ठाम मत होते. दरम्यान त्यांनी कोल्हापूर येथे ‘मातोश्री वृद्धाश्रम’ स्थापन करून समाजकार्य केले. त्यांच्या पश्चात या वृद्धाश्रमाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सांभाळत आहेत. राजशेखर यांचे धाकटे चिरंजीव स्वप्नील राजशेखर यांनी देखील मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका सृष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी, राजा शिवछत्रपती, कुलस्वामिनी, स्वप्नांच्या पलीकडले, अजूनही चांद रात आहे, चार दिवस सासूचे, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, धिंगाणा, एक अलबेला मधून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर हिने नुकतेच एका नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
ही मालिका आहे सोनी मराठी वाहिनीवरील “स्वराज्य सौदामिनी ताराराणी”. कृष्णा राजशेखर या मालिकेत छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी “जानकीबाई राणीसाहेबांची” भूमिका बजावत आहे. स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही कृष्णा राजशेखर हिची पहिली टीव्ही मालिका ठरली आहे. याअगोदर कृष्णा ने हिमालयाची सावली या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. कृष्णाने कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून अभिनयाचे धडे देखील गिरवले आहेत. वडील स्वप्नील राजशेखर यांच्या प्रमाणे कृष्णाला गाण्याची देखील आवड आहे. स्वप्नील राजशेखर यांचा मुलगा शौनक राजशेखर याला संगीताची आवड आहे आणि तो उत्कृष्टपणे गिटार वाजवताना दिसतो. कृष्णा राजशेखर हिचे स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतील पदार्पणासाठी अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…