महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाहीतर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासावेळी नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील समीर चौघुलेच्या विनोदी अभिनयाचं कौतुक वाटतं. त्यामुळे हा शो आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही हे स्पष्ट होते. समीर चौघुले, गौरव मोरे, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, शिवाली परब, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर. अरुण कदम अशा अनेक हास्यवीरांनी शोमध्ये धमाल उडवून देत प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवलं आहे.
मध्यंतरी या शो ने काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु आता पुन्हा हा शो एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. निखळ मनोरंजनाचे साधन म्हणून प्रेक्षक या शोकडे पाहत असतो. मात्र आता या शोमध्ये लवकरच मोठे बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण आता चिमुकल्या कलाकारांची देखील एन्ट्री होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा छोटे हास्यवीर’ या स्पर्धेत तुम्हाला सुद्धा विनोदी अभिनयाची संधी मिळणार आहे. १४ वर्षाखालील मुलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सोनी लिव्ह अँपवर जाऊन तुमचा विनोदाचे सादरीकरण केलेला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चिमुरड्यांमधून पाच कलाकार निवडण्यात येतील, जे सरळ या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सहभागी केले जातील. स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या चिमुरड्यांना ही जणू सुवर्णसंधीच चालून आल्याने अनेकजण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तयारीला लागले आहेत. या स्पर्धेमुळे आपल्या मुलांना छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळणार आहे; त्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. ज्या बालकलाकारांना अभिनय क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणीच ठरली आहे. शोमध्ये सहभागी झाल्यानंतर या बालकलाकारांना मोठी प्रसिद्धी तर मिळेल. शिवाय आपल्या उत्तम अभिनयाने त्यांना मालिकेत देखील काम करण्याची संधी चालून येऊ शकते.
चला हवा येऊ द्या ह्या शोमध्ये देखील असे नवनवीन प्रयोग करण्यात आले होते. या शोमध्ये सहभागी झालेले बालकलाकार प्रसिद्धी मिळवताना दिसले आहेत. सोनी मराठी वाहिनीने देखील असे नवनवीन प्रयोग करण्याचे ठरवले आहे. स्पर्धेमधून सर्वोत्कृष्ट पाच बालकलाकार निवडल्यानंतर त्यांना हास्यजत्रा मध्ये सहभागी होऊन विनोद सादर करता येणार आहे. ही संधी १४ वर्षाखालील मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.