अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका मृणाल देव कुलकर्णी ह्या चित्रपट आणि नाट्य सृष्टीत एक अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखल्या जातात. प्रसिद्ध लेखक, दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर हे मृणाल यांचे आजोबा तर साहित्यिक वीणा देव या त्यांच्या आई आहेत. मृणाल यांनी मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाईंची भूमिका त्यांनी साकारली. ऐतिहासिक मालिकेतील वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव आज घरोघरी पोहोचले आहे.
अठरापगड जातींची मोट बांधून अखंड हिंदूस्तानच्या इतिहासाला न भुतो न भविष्यती कलाटणी देणाऱ्या; ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, ज्यांनी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवले, जण सामान्यांच्या उरात स्वाभिमान भिनवला अशा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, अखंड लक्ष्मीअलंकृत सकल सौभाग्य संपन्न राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची भूमिका जेव्हा मृणाल लीलया साकारतात तेव्हा साक्षात आऊसाहेब समोर असल्याचा भास होतो. त्यांच्या या अष्टपैलू भूमिकेचे खुद्द शतायुषी महाराष्ट्रभुषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी भरभरून कौतुक केले आणि शिवछत्रपतींना तलवार सोपवितानाचा फोटो फ्रेम करून आण भिंतीवर लावायचा आहे अशी फर्माईश मृणाल यांच्याकडे केली. राजा शिवछत्रपती मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे आणि मृणाल यांचा हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. ऋषितुल्य गुरूंकडून आभाळाएवढं सुख आणि क्षीरसागराएवढं समाधान देणारा दुर्मिळ सुवर्णयोग कलाकारासाठी दुसरा कोणता ठरू शकेल.
मृणाल कुलकर्णी यांनी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनेक ऐतिहासिक भूमिकांना त्यांनी स्वत:चा हटके बाज दिला आहे. सहेला रे या सिनेमाचे दिग्दर्शनामध्ये त्या सध्या व्यस्त आहेत. मृणाल यांनी आजवर फत्तेशिकस्त, फर्जंद, ती आणि ती, कुछ मीठा हो जाये, क्वेस्ट, राजवाडे एन्ड सन्स, देह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बायो, यलो, रास्ता रोको, रेनी डे, वीर सावरकर अशा अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय केला. खेल, टीचर, द ग्रेट मराठा, द्रौपदी, मीराबाई, श्रीकांत, सोनपरी, स्पर्श, स्वामी, हसरतें, अवंतिका मालिका त्यांनी दमदार अभिनयाने अजरामर केल्या आहेत.सहेला रे या आगामी चित्रपटाची चाहते उत्कंठतेने वाट पाहून आहेत.