“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गायलेले लोकप्रिय गीत आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केले, आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक, तृप्ती अशा अनेक मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट गाजवला होता. चित्रपटातील हे गाणं चित्रित झालं होते बालकलाकार तृप्ती वर. या चित्रपटाव्यतिरिक्त तृप्तीने महेश कोठारे यांची नायिका म्हणून घरचा भेदी या मराठी चित्रपटात काम केले होते. तृप्ती हिने अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची घाप पाडली..

अभिनेत्री तृप्ती हिचे पूर्ण नाव आहे तृप्ती नाडकर. तृप्तीचा जन्म दार्जिलिंगचा, आई मायादेवी या एक स्थानिक प्रसिद्ध गायिका होत. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच तृप्तीने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मराठी कुटुंबात जन्मलेली आणि भाषेची उत्तम जाण या कारणाने तिला चांदणे शिंपित जा, घरचा भेदी अशा मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. तिने साकारलेला गोदाम हा हिंदी चित्रपट देखील खूपच गाजला होता. गुजराथी, हिंदी चित्रपट साकारत असताना तिचे दिग्दर्शक असलेले काका तुलसी घिमिरे यांनी नेपाळी चित्रपटात तिला प्रमुख नायिका साकारण्याची संधी दिली. वयाच्या १५ व्या वर्षी कुसुमे रुमाल हा नेपाळी चित्रपट तिने आपल्या अभिनयाने गाजवला. एक बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेली तृप्ती दिग्ग्ज नायिकांच्या यादीत आपले स्थान प्रस्थापित करण्यात यशस्वी झाली होती, त्यावेळी एका चित्रपटासाठी तब्बल दीड लाख मानधन स्वीकारत असे.

मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या तृप्तीला नेपाळी फारशी येत नव्हती त्यामुळे या चित्रपटात तिचे डायलॉग डबिंगकरून दिले जात असायचे. दरम्यान मुंबई स्थित इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस असलेल्या व्यवसायिकाशी तिचे लग्न झाले. आपल्या कारकिर्दीत समझाना, कोसेली, लहुरे असे अनेक चित्रपट साकारत असताना १९८८ साली अभिनय क्षेत्रातून संन्यास घेण्याचा निर्णय तिने घेतला. लग्न होऊन घरसंसार आणि मुलांना वेळ देता यावा यासाठी असा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. तृप्तीचा थोरला मुलगा हा मुंबईतील तिने सुरू केलेला ‘तृप्तीज् डान्स क्लास’ चालवत असून तिचा धाकटा मुलगा जाहिरात आणि टेलिव्हिजन मालिका क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयातून विलिप्त झालेल्या तृप्तीने अनेक वर्षांनी आमको काख, कुसुमे रुमाल २, कोही मेरो असे आणखी काही चित्रपट तिने साकारले. आज एक नेपाळी अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली तृप्ती कधीकाळी मराठी चित्रपटातही गाजली हे एक मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. तृप्तीवर चित्रित झालेलं चांदणे फुलांनी हेगाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे आणि कायम राहील.