बाहेरगावाहून मुंबईत येणे आणि कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत स्थान निर्माण करणे हे खरं तर खूप मोठ्या कष्टाचं काम असे. परंतु आजकाल ही प्रक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमाने अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे आताच्या घडीला नवख्या कलाकारांना काम मिळणे अगदी सहजसोपे झाले आहे. परंतु ज्या काळात या सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या तिथे केवळ आणि केवळ स्ट्रगल करण्याशिवाय पर्याय नसायचा. असाच स्ट्रगल संदीप पाठकला देखील चुकला नाही. बीड जिल्ह्यातील माजलगाव हे संदीपचे मूळ गाव. पुढील शिक्षणासाठी त्याने औरंगाबाद गाठले मात्र अभिनयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसे.
पुण्याच्या ललित कलाकेंद्रमधून त्याने नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आणि आपली पाऊले मुंबईच्या दिशेने वळवली. परंतु मुंबईत आल्यावर इथे ना कोणी मित्र ना कोणी नातेवाईक त्यामुळे जे काही करायचंय ते स्वतःच्या बळावर करायचंय हे त्याचवेळी कळून चुकले होते. एका आजोबांकडे पेइंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय झाली. पण संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच तिथे राहायला मिळायचे. ९ च्या ठोक्याला ते आजोबा खोलीला कुलूप लावायचे त्यामुळे काहीतरी काम शोधण्या शिवाय पर्यायच उरला नव्हता. नाटकाची आवड एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे घेऊन गेली. ‘सर आले धावून’ या नाटकाची तालीम सुरू होती त्यात लक्ष्मीकांत बेर्डे महत्वाच्या भूमिकेत होते.
नाटकाची तालीम बघायला मिळणे हेच त्यावेळी खूप महत्वाची संधी होती. त्यावेळेला माझी शरीरयष्टी खूपच किरकोळ होती त्यात वडिलांचे निधन झाल्याने डोक्यावरचे केस भादरले होते. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे माझ्याकडे लक्ष्य गेले माझ्या शरीराकडे पाहून ते म्हणाले होते की, ‘अरे याला आधी जेवायला घाला कोणीतरी’. याच नाटकात एका कलाकाराच्या अनुपस्थितीत मला अभिनयाची संधी मिळाली. श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा. तसेच एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, ईडक, राख अशा चित्रपटातून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला.
वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाने संदीपला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. या नाटकाचे संदीपने देश विदेशात जवळपास सव्वा चारशे हाऊसफुल्ल प्रयोग केले आहेत. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी या आगामी चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आपल्या प्रवासाबाबत संदीप म्हणतो की, मुंबई शहराचा स्वभाव इथल्या समुद्रासारखा आहे आधी तो बाहेरून आलेल्याना बाहेर फेकतो पण तुमची जिद्द आणि चिकाटी पाहून तो तुम्हाला सामावून घेतो.