लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ विनोदी अभिनेता म्हणून चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. विनोदी भूमिका ही चित्रपटाची प्रमुख भूमिका ठरू शकते याचे समीकरण दादा कोंडके यांच्यामुळे बदलले. त्यांच्याचमुळे नायकाला एक वेगळी बाजू मिळाली असे लक्ष्मीकांत बेर्डे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. आज त्यांच्या बाबत घडलेला आणखी एक किस्सा पाहूया. खरं तर आपण बालपणी तिकीट कंडक्टर बनायचं असं लक्ष्मीकांत बेर्डे यांचं स्वप्न होतं. तिकिटाचे सगळे पैसे घरी घेऊन यायचं. मात्र हे दिवसभर जमा झालेले पैसे परत द्यावे लागतात, हे त्यांना फार उशिरा समजलं.
दरम्यान आपला मुलगा मॅट्रिक पास होणार नाही, अशी खात्री लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वडिलांना होती. तेव्हा वडिलांनी एका कंपनीत नोकरीला लावलं. ही नोकरी मनाविरुद्ध असल्याने त्यांनी जेमतेम महिनाभर केली आणि नोकरीला कायमचा रामराम ठोकला. नाटकातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शांतेचं कार्ट चालू आहे या नाटका दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री रुही सोबत लग्न केले. दरम्यान रुही बेर्डे यांनी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा चांगला ठसा उमटवला होता. आ गले लग जा हा रुहीचा पहिला हिंदी चित्रपट. हिंदी सृष्टीत ओळख बनवलेल्या रुहीची आराम हराम आहे, डार्लिंग डार्लिंग, दोस्त असावा तर असा, दुनिया करी सलाम, जावई विकत घेणे आहे. मामला पोरींचा हे मराठी चित्रपट, नाटक खूप गाजले.
रुही बेर्डे लक्ष्याच्या आयुष्यात आली आणि लक्ष्याला खरी लक्ष्मी प्राप्त झाली असे म्हटले जाते. तिच्या येण्याने लक्ष्मीकांत हे नाव लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. सुरुवातीला रुहीला अनेकदा मुलाखतीसाठी बोलावले जायचे. पण लक्ष्मीकांत सुद्धा हरहुन्नरी कलाकार आहे तुम्ही त्याचीही मुलाखत घ्या असे त्या आवर्जून सांगत असत. रुही सोबत १५ वर्षांच्या संसारात लक्ष्मीकांत यांच्या आईचे मग नंतर वडिलांचे निधन झाले. मात्र रुहीने त्यांची कमी कधीच भासू दिली नाही, हे लक्ष्मीकांत बेर्डे आवर्जून म्हणत. पण जेव्हा ५ एप्रिल १९९८ रोजी रुहीचे निधन झाले त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे पूर्णपणे खचून गेले होते. दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे कोणाशीही बोलत नव्हते. या दुःखद प्रसंगानंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांनी एक मुलाखत दिली होती. या प्रसंगामुळे माझं जहाज बुडालं असं मला वाटलं असे या मुलाखतीत म्हणाले होते.