चला हवा येऊ द्या मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला कुशल बिद्रिके हा खऱ्या आयुष्यात देखील मिश्किल स्वभावाचा आहे. अनेकदा सहकलाकारांसोबतचे गमतीशीर व्हिडीओ काढून त्यातून तो विनोद निर्मिती करताना दिसत असतो. चित्रपट मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करणार कुशल आपल्या याच खास अंदाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतो. या स्ट्रगलच्या काळात त्याला त्याच्या पत्नीची मोठी साथ मिळाली होती. काही महिन्यांपूर्वीच सूनयनाने कथकनृत्यात पदवी मिळवली होती. तिला अनेकदा वेगवेगळ्या मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
सूनयनाचे हे यश पाहून कुशल कायमच तिचे कौतुक करत असतो. सूनयना तिच्या मुघल ए आझम या कार्यक्रमासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. त्यानिमित्ताने कुशलने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. कुशल पत्नीला निरोप देताना मिश्किल अंदाजात म्हणतो की, यार सुनयना, तू काय बाबा आता अमेरिकेला जाणार, “मुघल ए आजम” मधे डांस बिंस करणार. पिझ्झा बर्गर खाणार, झ्याक प्याक राहणार. जायचं आहे तर जा, “आमाला काय बाबा”. खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना घराला, म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हा, हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल.
शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल. “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल. काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”. अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल. आणि मी, मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची. तुझ्या वाचून रिकामी. तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार. मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही. पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा. कुशलची कॉमेडी तर हिट आहेच पण लाईफ पार्टनर सोबतची emotional side पण चाहत्यांना नेहमीच आवडत आली आहे.