ऑनस्क्रिन खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडियावर पेजवर अनेकदा गंभीर विषय मांडत असतो. कुशलच्या पोस्ट, व्हिडिओ नेहमीच काहीतरी वेगळा विचार सांगत असतात. कलाकार म्हणून तो खूपच संवेदनशील आहे. नुकतीच त्याने मैत्रीवर एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याच्या आयुष्यातून नेमकं काय हरवलं आहे हे सांगणारी ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. विनोदी अभिनेता कुशल बद्रिके गंभीर झाल्याची पोस्ट वाचून चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तुझी हरवलेली गोष्ट मिळूदे अशा प्रतिक्रियांचा पाऊस चाहत्यांकडून पडतोय. आयुष्यात सावली सारखे वावरणारे मित्र अचानक हरवल्याची त्याची हि पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
कुशल बद्रिके हे नाव जरी घेतलं तरी त्याच्या विनोदी किस्से आणि अफलातून अभिनयाच्या आठवणीने आपसूक ओठावर हसू येतं. चला हवा येऊ द्या या शोमधून कुशलच्या विविध भूमिका आणि त्याच्या विनोदाचं टायमिंग किती अचूक आहे याची कल्पना येते. पडद्यावर पोट धरून हसवणाऱ्या कलाकारांच्या पंक्तीत कुशलने वरचं स्थान मिळवलं आहे. स्किट करत असताना तर कुशल विनोदाचे पंच मारत असतोच पण प्रत्यक्ष आयुष्यातही तो खूप मिश्किल आहे. विनोदी कलाकार असूनही त्याच्यामध्ये कमालीची संवेदनशीलता देखील आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेला कुशल अशा काही गोष्टी मांडत असतो की त्या खोलवर विचार करायला लावतात.
नुकतीच त्याने मैत्री आणि आयुष्यातून हरवलेल्या मित्रांची आठवण करणारी भावनिक गोष्ट शेअर केली आहे. कुशलने एक फोटो शेअर केला असून यात तो ट्रेनच्या खिडकीतून बाहेर नजर लावून बसला आहे, त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत. या फोटोत त्याने रंगबेरंगी हुडी जॅकेट घातलं आहे. त्याने यावर लिहिलेल्या ओळी, घातलेली हुडी आणि आठवणी असा गोफ त्याने यात विणला आहे. प्रचंड संघर्ष करून आजचं यश कमावलं आहे असं तो नेहमीच सांगतो, या प्रवासात मित्रांची मोलाची साथ मिळाली. इतकंच नव्हे तर त्यानेही मित्रांना शक्य ती मदत केली. पण सध्याच्या धावपळीत हे मित्रच कुठेतरी मागे सुटले आहेत आणि त्याचीच त्याला आठवण येत असल्याची ही पोस्ट सांगते.
कुशलनं लिहिलं आहे की, काही वर्षापूर्वी माझ्याकडे ही अशी चित्र विचित्र रंगाची एक हुडी होती. ती हुडी मला खूप आवडायची, पण माझ्या एका मित्राला ती हुडी कधीच आवडली नाही. काळाच्या ओघात ती हुडी कुठे हरवली कुणास ठाऊक. पण फुलपाखराच्या रंगासारखे तिचे रंग मात्र आजही मनात कायम भरून राहिले आहेत. काही मित्रांचंही पुढे असंच त्या हुडीसारखं झालं, हरवले ते हरवलेच. रंग मात्र जमा होत राहिले. कुशलची ही पोस्ट फारच हृदयस्पर्शी आहे. या पोस्टवर कुशलच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. पण ज्या मित्रासाठी कुशलने ही पोस्ट लिहिली आहे, तो हरवलेला मित्र लवकरात लवकर सापडावा असं त्याच्या चाहत्यांनाही वाटतंय.