काही दिवसांपूर्वीच अभिज्ञा भावे हिने मोबाईल चोरी झाल्याची घटना सोशल मीडियावर शेअर केली होती. शूटिंग आटोपून ठाण्याहून घरी जात असताना रात्री घरी जाण्यासाठी तिने रिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. रिक्षात बसल्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमानी तिच्या हातातला मोबाईल हिसकावून नेला होता. त्यावेळी अभिज्ञा भावेने या घटनेचा तपास व्हावा आणि मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष्य घालून ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जावेत अशी मागणी केली होती. ही घटना निवळते न निवळते तोच आता प्रसिद्ध अभिनेत्री कृतीका देसाई हिला देखील असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. कृतिका देसाई ही बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे.
९० च्या दशकात कृतिकाने हिंदी मालिका सृष्टीत पदार्पण केले होते. बुनियाद, उतरण, देख भाई देख, चंद्रकांता, जुनुन अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून कृतिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. साधारण चार दिवसांपूर्वी कृतिका शूटिंगवरून घरी जायला निघाली होती. दिवसाढवळ्या गोरेगाव येथील फिल्मसिटी ते गोकुळधाम या परिसरात आल्यानंतर तीन अज्ञात इसमांनी बाईकवर येऊन कृतिकाची गाडी थांबवली. गाडीत ड्रग्स असल्याचे खोटे सांगून गाडी चेक करायची आहे असे ती व्यक्ती म्हणाली. कृतिकाला प्रथमदर्शनी त्यांच्यावर संशय आला आणि तिने त्यांना आयडीकार्ड विचारले. जवळचे पिवळ्या रंगाचे काही कागद दाखवून त्यांनी माझ्या हाताचा वास घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी लेडी कॉन्स्टेबलला बोलवा आणि मगच तुम्ही माझी तपासणी करा असे तिने ठणकावून सांगितले. त्यानंतर तिने मोबाईलमध्ये ही सर्व घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांना माझ्याकडून काही पैसे मिळतात का याच्यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप चालू होता. परंतु जेव्हा त्यांना हे सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचे समजले तेव्हा या तिघांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडीओ कृतिकाने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. या घटनेतून मी सुखरूप निसटले मात्र इतरांनी देखील यातून सतर्क राहण्याचा सल्ला तिने दिलेला पाहायला मिळतो आहे. मी या घटनेची सर्व माहिती पोलिसांना देणार आहे आणि त्या तिघांविरोधात तक्रार दाखल करणार आहे.
मला अजूनही खात्री आहे की हे लोक तुमच्यासारख्या कलाकारांना किंवा दुसऱ्या कोणालाही लुटायला तयार आहेत. त्यामुळे सतर्क राहा असे आवाहन तिने या पोस्टमधून केले आहे. कृतिकाने शेअर केलेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी विश्वात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. अशा घटना वारंवार ऐकायला मिळतात मात्र आता दिवसाढवळ्या असे लुटारू जर लूटमार करत असतील तर वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यावर ठोस उपाययोजना झाल्याशिवाय अशा ठिकाणी प्रवास करणाऱ्यांनी तितकेच सतर्क राहायला हवे. कलाकारांना रात्री अपरात्री नेहमीच असा धोका पत्करून प्रवास करावा लागतो. यात कित्येक कलाकारांना असे अनुभव आलेले आहेत.