झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये हा शो स्टार प्रवाहवरील मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. या मंचावर मराठी सेलिब्रिटींचा स्वयंपाक करताना झालेला गोंधळ पाहायला मिळतो. केवळ कलाकारच नाही तर राजकीय मंडळींनी देखील किचन कल्लाकारमध्ये येऊन धमाल उडवली आहे. आता यात आणखी एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून या मंचावर स्टार किड्सची एन्ट्री होताना दिसणार आहे. त्यामुळे ही धमाल मस्ती पाहायला प्रेक्षक देखील आतुर झालेले आहेत.
प्रणव रावराणे आणि श्रेया बुगडे यांना यावेळी बांधून ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाची धुरा या चिमुकल्यानी त्यांच्या खांद्यावर पेललेली पाहायला मिळणार आहे. अर्थात संकर्षण कऱ्हाडे आणि प्रशांत दामले हे दोघेही सारखं काहीतरी होतंय या नाटकानिमित्त व्यस्त आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी त्यांनी या शोमधून ब्रेक घेतलेला आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या अनुपस्थितीत सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेया बुगडे सांभाळताना दिसते. मात्र आता श्रेया बुगडेची जबाबदारी शौर्या वसईकर पेलताना दिसणार आहे. या बालकलाकार विशेष भागाची रंगत आज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. किचन कल्लाकारच्या मंचावर ह्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला मालिकेतील लाडू दाखल होतोय.
किचन कल्लाकारच्या मंचावर ह्या आठवड्यात लाडू म्हणजेच राजवीरसिंह रणजित गायकवाड प्रशांत दामले महाराजांची खुर्ची सांभाळताना दिसणार आहे. यासोबतच स्नेहलता वसईकर हिची मुलगी शौर्या वसईकर सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. तर राजशेफच्या भूमिकेत राहुल देशपांडे यांची कन्या रेणुका देशपांडे पाहायला मिळणार आहे. हे बालकलाकार आणि स्टार किड्स काय धमालमस्ती करणार आहेत याची उत्सुकता आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर बऱ्याच कालावधीनंतर लाडू झी मराठी वाहिनीवर झळकणार आहे. प्रशांत दामले यांची खुर्ची सांभाळत तो किचन मध्ये बनवलेल्या पदार्थांची चव चाखणार आहे.