Breaking News
Home / मराठी तडका / शाहरुखची पाठराखण करीत किरण माने यांनी दिली भली मोठी यादी..
shahrukh khan kiran mane
shahrukh khan kiran mane

शाहरुखची पाठराखण करीत किरण माने यांनी दिली भली मोठी यादी..

अभिनेते किरण माने  यांनी शाहरुख खानच्या समर्थनात एक वेगळीच पोस्ट लिहिली आहे. आर्यनच्या झालेल्या अटकेवरून आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे शाहरुख खान मात्र मिडियापासून जरा जपून राहिलेला पाहायला मिळाला. परंतु त्याने आजवर केलेल्या सामाजिक कामांचा आढावा देत तो किती चांगला आहे याची भली मोठी यादीच त्यांनी दिली आहे. आर्यन वर झालेल्या अटकेवर आजवर कुठलीही प्रतिक्रिया शाहरुख खानने दिली नसली तरीही बॉलिवूड आणि राजकीय मंडळी त्याची पाठराखण पाहताना दिसत आहेत.किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते पाहुयात…

shahrukh khan kiran mane
shahrukh khan kiran mane

“आपन ऐर्‍यागैर्‍यांना डोक्यावर घेत नाय भावांनो ! ह्यो किरण माने सातारी मातीतला हाय.. उगं कुना लुंग्यासुंग्याची उगाच तळी उचलून धरनार्‍यातला नाय ! समोर मानूसच डोंगराएवढा हाय… त्याची का स्तूती करनार नाय सांगा? त्यो मानूस समाजासाठी काय-काय करतो हे जर सांगीतलं, तर त्याची निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल.. सगळा पिच्चर नाय सांगत..फक्त ‘ट्रेलर’ सांगतो.. ऐकाच.. ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करनं.. त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करनं.. त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देनं..आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहान्यासाठी सगळी आर्थिक मदत करनं.. ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय.. ! खायचं काम नाय भावांनो.. आपल्या आईवडिलांच्या आठवनीसाठी नानावटी हाॅस्पीटलात त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत लै मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो ! २०१२ साली त्यानं देशभरातली १२ खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देन्याचं काम त्यानं केलं. अजूनबी तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देन्याचं काम तो आजतागायत करतोय ! २००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून ३० दशलक्ष रूपये जमा करुन दिले !

“२०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये.. २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी ३३ लाख रूपये.. तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या ‘त्सुनामी रिलिफ फंड’साठी २५ लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले ! एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला.. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली, अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यन्तचा सगळा हाॅस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी २ लाख रूपये होता ! भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो ! २००९ मध्ये ओरीसामधल्या ७ खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसीटी प्रोजेक्ट सुरू केले, ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गांवांमध्ये ‘लाईटस्’ आले ! I.P.L. सिझन ७ मध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हनून १५ कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली ! महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी ७ कोटी रूपये दिले !

actor kiran mane
actor kiran mane

मधल्या काळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लाॅकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन पुरवलं. अशी लै लै कामं हायेत गड्याहो, मला अशा कमीतकमी दहा पोस्टस् कराव्या लागत्याल यवढी !! लक्षात ठेवा, ह्यो किरन माने कुठल्याबी मानसाला नीट पारखतो ‘काम’ बघून ‘सलाम’ करतो..! या त्याच्या कामांची जगभर दखल घेतली गेलेली हाय बरं का, त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या युनेस्को ॲवाॅर्डस् मध्ये स्पेशल ॲवाॅर्ड देऊन सन्मानित करन्यात आलंय. साऊथ कोरीयानं त्याला ‘गुडविल ॲम्बॅसीडर’ म्हणून सन्मानित केलंय. इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या ‘लाॅ युनिव्हर्सिटी’तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देन्यात आलीय. तो फक्त अभिनयातला ‘बादशाह’ नाय, तर ‘मानूस’ म्हनून बी ‘किंग’ हाय ! सलाम शाहरूख खान कडकडीत सलाम !! कुठल्याबी सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटंल.. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा भावा !!!” किरण माने.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.