महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. आपल्या आजोबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना एक मानाचा मुजरा म्हणून केदार शिंदे यांना त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवायचा होता. गेल्या चार वर्षांपासून ते या चित्रपटाच्या तयारीला लागले होते. आपलाच मित्र अंकुश चौधरी शाहीरांची भूमिका चोख बजावेल हा विश्वास केदारला होता. तर आजीच्या भूमिका आपली मुलगी सना का नसावी हाही विचार त्यांनी केला. मग चित्रपटाचे ठिकाण, कलाकारांची निवड करत हा चित्रपट पूर्णत्वास आला. चित्रपटाच्या टिझरला तर प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दर्शवत त्याबद्दल उत्सुकता दर्शवली.
बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण अशी दिग्गज मंडळी शाहिरांच्या जवळ कशी आली याचा उलगडा चित्रपटातुन होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यानिमित्त केदार शिंदे बोलते झाले. यावेळी ते म्हणाले की, २०१५ साली आजोबांचे निधन झाले. त्यानंतर मला जाणवायला लागलं की हळूहळू त्यांचं नाव पुसलं जातंय. कधीच शाहीर साबळे यांच्या सारख्या कलाकाराची जन्मशताब्दी साजरी होणार नाही का? त्यामुळे मी त्यांच्यावर चित्रपट बनवायचे ठरवले. जर असे कलाकार पुढच्या पिढीला कळले नाहीत तर यासारखे मोठे दुर्दैव काय असू शकते. कधीतरी आम्हाला कोणी विचारले की तुमच्या पिढीच तुम्ही काय केलं. तर हा कुठेतरी त्रास होत होता म्हणून महाराष्ट्र शाहीर बनवण्यात आला. यावेळी केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्यासोबतच्या काही खास आठवणी सांगितल्या.
१९८३ साली मी दहा वर्षांचा होतो, तेव्हापासून मी बाबांसोबत काम करत होतो. लोकधाराशी मी जोडला गेलो होतो तेव्हा मला बाबा खरे कळायला लागले होते. कॉलेजला गेल्यानंतर अंकुश, भरत, संतोष ही सर्व माझी मित्रमंडळी एकांकिका करत होतो. आम्ही १८, १९ वर्षांचे तरुण त्यामुळे कोणीही एकांकिकेसाठी आम्हाला मुलगी द्यायला तयार नव्हतं. अर्थात मुलगी म्हणजे आमच्या नाटकात स्त्री भूमिका साकारण्यासाठी कलाकार मिळत नव्हती. तेव्हा स्त्री पात्र विरहित एकांकिका करायची म्हणून बाबांनी केलेल्या एका नाटकाचे आम्ही सादरीकरण केले होते. १९५२ साली त्यांनी हे नाटक लिहिले होते त्यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा मला हेवा वाटायचा. बापाचा बाप ही ती पहिली एकांकिका होती. त्यानंतर मी अनेक एकांकिका नाटक केले.