‘हम है राही प्यार के’, ‘चायना गेट’ बॉलिवूड चित्रपट अभिनेते के डी चंद्रन यांचे काल १६ मे रोजी हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. १२ मे रोजी जुहू येथील क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते त्यावर उपचार सुरू असतानाच हृदयाच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. कोई मिल गया, हर दिल जो प्यार करेगा, तेरे मेरे सपने , मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हुं या काही बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी काम केले होते शिवाय गुलमोहर ही हिंदी मालिका त्यांनी साकारली होती.
के डी चंद्रन हे बॉलिवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आहेत. सुधा चंद्रन यांचे नृत्यावरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. अनेक बॉलिवूड चित्रपट तसेच हिंदी मालिकेतून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नृत्याला आपला प्राण समजणाऱ्या सुधा चंद्रन यांचा १९८१ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अपघात झाला होता या अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. कृत्रिम पाय बसवून आजही नृत्याची आवड त्या जोपासत आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला सुधा चंद्रन यांनी आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यासोबत तुम्ही दिलेल्या प्रेरणेनेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे असे म्हणून वडिलांचे आभार देखील त्यांनी मानले होते.
आमच्या समूहाकडून दिवंगत अभिनेते के डी चंद्रन यांना भावपूर्ण श्रद्धांजली…