मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटातली एक बालकलाकार ते मुख्य नायिकापर्यंत मजल मारणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
८० च्या दशकात अभिनेत्री पल्लवी जोशीने बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. नाग मेरे साथी, बदला, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा, आदमी सडक का या हिंदी मराठी चित्रपटातून ती बालभूमिकेत झळकली होती. सौदागर, पनाह , मुजरीम या चित्रपटात तिला सह नायिकेच्या भूमिका मिळाल्या त्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. रेणुका शहाणे यांच्या रिटा या मराठी चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली. मिस्टर योगी, भारत एक खोज, मृगनयनी, तलाश, असंभव, अनुबंध, सारेगमप लिटिल चॅम्पस या मालिकांमधून ती विविधांगी भूमिकेत पाहायला मिळाली. १९९७ साली दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या सोबत पल्लवी विवाहबद्ध झाली.
पल्लवी जोशीचे संपूर्ण कुटुंबच कालाक्षेत्राशी निगडित आहे. तिची सख्खी बहीण मराठी चित्रपट अभिनेत्री “पद्मश्री जोशी कदम” असून तिचा भाऊ अलंकार जोशी हा बॉलिवुडचा बालकलाकार म्हणून नावारूपास आलेला पाहायला मिळाला होता. पद्मश्री जोशी यांनी नणंद भावजय, पोरींची कमाल बापाची धमाल या मराठी चित्रपटात काम केले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते विजय कदम हे पद्मश्री जोशी यांचे पती आहेत.
अलंकार जोशी हा बॉलिवूड मध्ये मास्टर अलंकार म्हणून परिचयाचा आहे. अलंकारने दीवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर अलंकारला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्या काळातील सगळ्यात जास्त पसंती असलेला तो बालकलाकार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने सीता और गीता, शोले, धडकन, ड्रीमगर्ल अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालकलाकार म्हणून नावारूपास आलेला अलंकार कालांतराने चित्रपटातून बाजूला झाला आणि परदेशात जाऊन स्थायिक झाला. परदेशात गेल्यावर अलंकारने कम्प्युटर क्षेत्रात आपले करिअर करण्याचे ठरवले. यातून तो सध्या लाखोंची उलाढाल करताना पाहायला मिळतो आहे.