विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच ट्रेंड मध्ये आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणून द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसातच या चित्रपटाने जगभरातून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. जगभरातून या चित्रपटाला २७०० हुन अधिक स्क्रिनिंग मिळाले आहेत. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.२५ कोटींचा गल्ला जमवलेल्या चित्रपटाची जादू हळूहळू वाढत जाताना दिसत आहे. विकेंडला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो या अनुषंगाने शनिवारी १०.१० करोड आणि रविवारी १७.२५ करोडचा गल्ला या चित्रपटाने जमवला.

चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळत असून चौथ्या दिवस अखेर चित्रपटाने तब्बल ४७.८५ कोटींचा गल्ला जमवलेला दिसून आला. या वाढत्या प्रतिसादाला पाहून आम्ही या आठवड्यात १०० कोटींचा पल्ला गाठू असा विश्वास विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केला आहे. १९९० साली घडलेली ही घटना प्रत्यक्षात चित्रपटातून पाहायला मिळाल्याने सत्य समोर पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. विवेक अग्निहोत्री यांनी जगासमोर सत्य आणण्याचे धाडस दाखवले आहे. याचे जगभरातून कौतुक केले जात आहे तसा त्यांना पाठिंबा देखील मिळताना दिसत आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपट सोशल मीडियावर सध्या चर्चेत राहिलेला टॉपचा विषय ठरला आहे. मात्र आयएमडीबीच्या अहवालानुसार चित्रपटाचे रेटिंग घटवण्याचा आरोप लावण्यात आला होता.

अर्थात हे रेटिंग देणं सर्वस्वी प्रेक्षकांचा निर्णयावर अवलंबून असतं. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने नकार दिला होता ही बाब जेव्हा विवेक अग्निहोत्री यांनी उघड केली होती त्यावेळी कपिलवर जोरदार टीका करण्यात आली. एका मुलाखतीत बोलत असताना अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मला साधारण दोन महिन्यांपूर्वीच कपिल शर्माच्या शोमध्ये बोलावले होते. मी याअगोदर देखील कपिलच्या शोमध्ये गेलेलो आहे. मला त्याचा शो खूप आवडतो, मात्र हा शो एक कॉमेडी शो आहे. त्यामुळे आमच्या चित्रपटाचे गांभीर्य टिकून राहण्यासाठी मी या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा सीरियसनेस टिकून रहावा या उद्देशाने त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्याचे टाळले होते.