येतो आम्ही!.. असे म्हणत अभिनेता भूषण प्रधान याने ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका निरोप घेत असल्याचे कळवले आहे. एका पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सिरीज ह्यांचं जरा बरं असतं.. अमुक एक दिवसांनी आपल्याला ह्या पात्राची साथ सोडायची आहे हे माहित असतं. मालिकेचं तसं असेलच असं नाही.
शेवटचा दिवस हा आजही असू शकतो किंवा सहा महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनी. हयाआधीही ह्याचा अनुभव आल्याने कायमच सतर्क होतो. ‘भूषण, आजचा दिवस राजा म्हणून जगायला मिळतोय तो पूरेपूर जग’ स्वतःला रोज सांगायचो. ‘जय भवानी जय शिवाजी’ ह्या मालिकेसाठी अक्खी टीम खूप कष्ट घेत होती.. मालिकेची दर्जेदार क्वालिटी बघून मजेत दिग्दर्शकाला म्हणायचो, ‘आम्हाला टि. व्ही. मालिका सांगून आमच्याकडून वेबसिरीज बनवून घेताय’! खरच… नेमकेच भाग झाले… १०५! ह्याआधी अशी भूमिका करायला मिळाली नव्हती मात्र मिळाली ती योग्य वेळी! एक अभिनेता/ कलाकार म्हणून ही भूमिका पेलू शकतो अशाच वेळी. ‘येतोय आम्ही’ म्हणत पहिला प्रोमो रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या… चांगल्या, वाईट, कुत्सित! दुसऱ्या प्रोमोपासून प्रतिक्रिया अधिक सकारात्मक होत गेल्या आणि पहिल्या एपिसोडपासूनच भरभरून प्रेम मिळत गेलं ते कायमचं. अनेकांना आवडत असताना मालिका इतक्या लवकर संपतेय ह्याचं वाईट वाटावं… की प्रेक्षकांना मालिकेचा कंटाळा येण्याच्या आत मालिका संपतेय हयाचा आनंद? महाराजांची भूमिका करत असल्यामुळे अगदी कमी कालावाधीत बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. काही जाणीवपूर्वक तर काही अनवधानाने.
आपल्या आजूबाजूला काय घडतंय, परिस्थितीमध्ये काय बदल होतायत, येणाऱ्या अफवांमधे तथ्य असू शकते का, त्याची कारणं काय असू शकतात, असे अनेक विचार डोक्यात सुरु होते. आणि अशातच अचानक कळले की हा बाजींचाच नाही तर आपला आणि मालिकेचाही शेवटचा दिवस! धक्कादायक असूनही धक्का बसला नाही. खंबीर होतो.. राजांमुळे, राजांसारखा!” असे म्हणून भूषणने स्टार प्रवाह वाहिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज हयांची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले आहेत. तसेच आपण प्रेक्षकांनी भरभरून केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद! म्हटले आहे.