मराठी चित्रपट सृष्टी असो वा हिंदी अशा अनेक चित्रपटातून कधी नायिका तर कधी आई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा अल्पसा परिचय करून घेऊयात…
३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील चिकोडी तालुक्यातील खडकलरत या गावी त्यांचा जन्म झाला. १९४६ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले मात्र त्यांना त्यावेळी मराठी स्पष्ट बोलताही येत नव्हते असे म्हटले जाते. चित्रपट सृष्टीतील सुरुवातीपासूनचा काळ अनुभवलेल्या अभिनेत्रींपैकी सुलोचना दिदींचे नाव आवर्जून घेतले जाते. वहिणींच्या बांगड्या, सांगत्ये ऐका, मराठा तीतुका मेळवावा, साधी माणसं या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीकडे आपली पावले वळवली. नायिका, सहनायिका, मायाळू आई अशा भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. १९५९ सालच्या ‘दिल देके देखो’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली . त्यानंतर अनेक आघाडीच्या हिंदी नायकांच्या आईच्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनयातून सुरेख रंगवल्या. खरं तर हिंदी सृष्टीतील हे नायक सुलोचना दिदींपेक्षाही वयाने मोठे असायचे मात्र तरीही आईची भूमिका त्यांनी आपल्या अभिनयातून चांगलीच वठवलेली दिसली. ६० ते ७० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५० हिंदी चित्रपट आणि ५० मराठी चित्रपट साकारले हे विशेष. बंदिनी, देवर, कहाणी किसमत की, कोरा कागज, मजबूर, मुकद्दर का सिकंदर अशा गाजलेल्या चित्रपटातून अनेक आघाडीच्या हिंदी कलाकारांसोबत त्यांना अभिनयाची संधी मिळाली.
या प्रवासात त्यांनी अनेक मराठी कलाकारांनाही अभिनयाची संधी दिली, हिंदी चित्रपटातून कामे मिळवून दिली. चित्रपट सृष्टीला दिलेल्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज वयाची नव्वदी पार केलेल्या सुलोचना दीदी प्रभादेवी, मुंबई येथे राहत आहेत. कांचन घाणेकर ही त्यांची एकुलती एक कन्या. दिवंगत अभिनेते डॉ काशीनाथ घाणेकर हे त्यांचे जावई. हिंदी मराठी सृष्टीतला प्रदीर्घकाळ अनुभवलेल्या या निरागस अभिनेत्रीस उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा…
नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज आणि ट्विटर वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.