सोनी मराठी वाहिनीने प्रथमच मराठी इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोची घोषणा केली त्यावेळी नवख्या गायकांना मोठ्या व्यासपिठाची संधी उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची पाच ते सहा महिन्यांपूर्वी विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून १४ दर्जेदार गायकांची या शोमध्ये निवड करण्यात आली होती. त्यात कैवल्य केजकर, भाग्यश्री टिकले, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, अमोल सकट, ऋषिकेश शेलार, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे.
आम्रपाली पगारे, जगदीश चव्हाण, अश्विनी मिठे, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे आणि सुरभी कुलकर्णी या टॉप १४ स्पर्धकांनी पहिल्या सिजनमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. त्यानंतर मधल्या काळात या शोमध्ये देवश्री मनोहर हिची वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झालेला सुरांचा हा प्रवास काल अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला. २० एप्रिल रोजी मराठी इंडियन आयडॉलचा महाअंतिम सोहळा रंगला त्यात विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात आले. यात प्रतीक सोळसे, श्वेता दांडेकर, भाग्यश्री टिकले, सागर म्हात्रे आणि जगदीश चव्हाण या टॉप ५ स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले होते. मात्र प्रतीक सोळसे आणि भाग्यश्री टिकले यांना अंतिम तीनच्या यादीत स्थान निर्माण करता आले नाही.
टॉप ३ स्पर्धकांमध्ये श्वेता दांडेकर, सागर म्हात्रे आणि जगदीश चव्हाण यांनी आपले नाव नोंदवले. श्वेता दांडेकर हिने आपल्या वैधपूर्ण गायकीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती मात्र तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सेकंड रनरअप ठरलेल्या श्वेता दांडेकर हिला दोन लाखांचा चेक देण्यात आला. अंतिम सोहळ्यात जगदीश चव्हाण आणि सागर म्हात्रे यांच्यात विजेतेपदासाठी चुरस रंगली होती. परंतु सागर म्हात्रे हा एक स्ट्रॉंग कांटेस्टंट आहे हे सुरुवातीपासून पाहायला मिळाले होते. सागर म्हात्रे या स्पर्धकाने मराठी इंडियन आयडॉलच्या पहिल्या वहिल्या सिजनची विजयाची ट्रॉफी जिंकली. त्याला विजयाच्या ट्रॉफीसोबतच ५ लाखांचा चेक पारितोषिक म्हणून देण्यात आला. तर जगदीश चव्हाण या पहिल्या सिजनचा फर्स्ट रनरअप ठरला.
त्याला तीन लाखांचा धनादेश तसेच ट्रॉफी देण्यात आली. यासोबतच वामन हरी पेठे यांच्याकडून एक गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. भाग्यश्री टिकले आणि प्रतीक सोळसे हे देखील तगडे स्पर्धक होते मात्र त्यांना अंतिम तीनच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. अजय गोगावले यांचे वेळोवेळी आणि योग्य मार्गदर्शन या स्पर्धकांना मिळत गेले. स्पर्धकाला आठवड्यातून एकच गाणं गायची संधी मिळते, ते लाईफटाईम लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे असं अजय गोगावले यांचं म्हणणं होतं. हेच योग्य मार्गदर्शन मिळल्याने सागर म्हात्रे या स्पर्धकाने विजयाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरलेले पाहायला मिळाले. सागर म्हात्रे या विजेत्या स्पर्धकाला यशाच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!