स्वतःची सोशल फाउंडेशन संस्था सुरू करण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती, गोरगरीब मुलांचे, स्त्रियांचे हक्क त्यांचे आरोग्य आणि प्राणी यांजकडे लक्ष द्यायचे होते. आर्थिक साक्षरता द्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण, मुलांचे कुपोषण, प्राणी निवारा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते, हि संधी आज मला मिळाल्याबद्दल; माझ्या सहकारी मित्रांची मी कायम ऋणी असेन.. अशी समर्पक प्रतिक्रिया देणारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जॅकलिन फर्नांडिस.
२ ऑक्टोबर निमित्ताने बहुतेक सर्वांनाच सुट्टी होती, या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणारी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील जॅकलिन फर्नांडिस आज थेट पोहोचली मिठी नदीकिनाऱ्यावर. स्वच्छ भारत अभियान मोहिमेला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ योलो फाउंडेशन आणि आला बीच इंडिया संस्थेच्या निवडक सहकाऱ्यांसोबत तिने नदी पात्रातून वाहून आलेल्या प्लास्टिक आणि कचरा सफाई मध्ये सहभाग नोंदविला. “स्वच्छ शहर ही आपण स्वतःला आणि इतर नागरिकांना देऊ शकणारी सर्वोत्तम भेट आहे. आपले शहर, समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी अविरत काम करणाऱ्या आपल्या नजीकच्या संस्थांना आपण सर्व स्वयंसेवक बनून सहकार्य करू शकतो! हे सुंदर शहर, देश वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रतिज्ञा घेऊया.” असे आवाहन तिने केले आहे. भारतात वैद्यकीय सुविधा आणि उपकरणांची कमतरता असल्याने सेलिब्रिटी सहकाऱ्यांच्या मदतीने ऑक्सिजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड आणि औषधे पुरवण्याच्या पायाभूत सामाजिक कार्यात ती नेहमीच सक्रीय असते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. डी. शिवानंदन यांनी चालवलेल्या रोटी बँकेने आजवर लाखो भुकेल्या लोकांना जेवण दिले. रोटी बँक स्वयंसेवी संस्थेसोबत जॅकलीनने १ लाख गरजू लोकांसाठी रोजचे जेवण पुरविले आहे. फिलाईन फाउंडेशनसोबत भागीदारी करून भटक्या प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी मदत करीत आहे. पोलीस दलासाठीही तिने आजवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोलाची मदत केली आहे. तिने परोपकारी संघटन शक्तीवर कायम विश्वास ठेवला असून समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तत्पर राहण्याचे ती नेहमीच आवाहन करीत असते. जॅकलीन फर्नांडिसला किक, हाऊसफुल २ आणि अलादीन सारख्या चित्रपटांतील तिच्या सुंदर अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. जॅकलिन एक मॉडेल असून वर्ष २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका ही स्पर्धा तिने जिंकली होती. चित्रपटांमधील तिचा अभिनय किंवा मॉडेलिंग या सर्वांपेक्षा ती जेव्हा स्वयंसेवी संस्थांसाठी मोहिमा घेते तेव्हा ती सर्वात जास्त सुंदर वाटते. या निमित्ताने एक सुंदर वाक्य शेअर करावेसे वाटते, “तुमचे बाह्य सौंदर्य डोळ्यांना आवडेल, पण तुमच्या मनातील सौंदर्य हृदयाला भिडेल.”