‘शक्य आहे ! तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे !’ अशी धडाकेबाज स्लोगन असलेल्या अनन्या या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करीत असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असून ड्रीम विवर एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधव चोखंदळ प्रेक्षक वर्गाला छानशी कलाकृती सादर करतील यात शंका नाही. टिझर मध्ये हृताचे वेगळेच रूप आपल्याला दिसते ज्यात येणाऱ्या संकटांना स्वतः तोंड देऊन त्या लीलया पार करणारी व्यक्तिरेखा यातून समजते. टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध मालिका फुलपाखरू, दुर्वा आणि सध्या हाऊसफुल होत असलेले नाटक ‘दादा एक गुड न्यूज आहे’ तसेच ‘डुएट’ वेब सीरीज द्वारे सर्व स्तरातील रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली हृता दुर्गुळे चित्रपट सिनेसृष्टीत अनन्या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुरुवात करीत आहे.
पुढचे पाऊल साठी असिस्टंट दिग्दर्शनाने इंडस्ट्री मध्ये सुरुवात केल्यानंतर स्टार प्रवाह वरील दुर्वा मालिकेत तिची निवड झाली होती. करिअरच्या सुरुवातीलाच मोठा ब्रेक मिळालेली हृता खूपच मनमोहन असून तिने अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या हृदयावर राज्य केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दादा एक गुड न्यूज आहे या विनोदी नाटकात हृता सोबत उमेश कामत, ऋषी मनोहर, आरती मोरे यांनी दमदार अभिनयाची धमाल केली आहे. या नाटकाची निर्मिती स्वतः प्रिया बापट हिने केली आहे. फुलपाखरू मालिकेत तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली, मालिकेतील वैदेही फेम हृता दुर्गुळे सोबत यशोमन आपटे, प्रियांका तेंडोलकर, तृष्णा चंद्रोत्रे, पूर्व गोखले, प्रसिद्ध दिग्दर्शक सेलेब्रिटी प्रसाद ओक, आशिष जोशी अद्वैत कडने, नुपूर चिटेल, निलय घैसास अशी अफलातून कलाकारांची टीम होती. तिची ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ‘मन उडू उडू झालं’ हि आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच सुरु होत आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
‘अनेक महिन्यांनी शूट सुरु करत आहोत आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांमध्ये आहे. मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडेल’, अशी प्रतिक्रिया हृताने व्यक्त केली आहे.
सिंगिंग स्टार १ या रिऍलिटी शोमध्ये तिने होस्ट देखील केले आहे, रामनारायण रुईया या मुंबई मधील कॉलेज मधून मास मीडियाचे शिक्षण घेतलेली हृता सुरुवाती पासूनच अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली होती. हृताची आई नीलिमा, वडील दिलीप आणि भाऊ ऋग्वेद दुर्गुळे असा छोटासा सुंदर परिवार आहे. लवकरच अनन्या चित्रपट प्रदर्शित होईल आणि आपणा सर्वांना प्रत्यक्ष थिएटर मध्ये जाऊन याचा आस्वाद घेता येईल अशी आशा बाळगूया.