चित्रपट, मालिकेतून नायक नायिकेची भुमिका एवढीच विनोदी आणि खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. सतत रडणाऱ्या सिन पेक्षा कधीतरी हलकी फुलकी कॉमेडी केल्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कुठेतरी गंमत वाटावी म्हणून अशा पात्रांना संधी दिली जाते. खरं तर विनोद करणे आणि प्रेक्षकांना हसवणे या गोष्टी मुळीच सोप्या नाहीत. अशा भूमिकांमध्ये पुरुष मंडळी जास्त लोकप्रिय ठरले तिथेच काही महिला कलाकारांनी सुद्धा आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. त्यातील एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गुड्डी मारुती होय. गुड्डी मारुती आणि टूनटून या अभिनेत्रींनी बेढब शरीराचा उपयोग विनोदी भूमिकेसाठी चांगलाच करून घेतला होता.
गुड्डी मारुती हिचे वडील मारुतीराव परब आणि आणि कमल परब दोघेही चित्रपट मालिकेत अभिनय करत होते. ५० ते ८० च्या दशकात मेरा नाम जोकर, शोर, बनारसी बाबू, गरम गरम, दरबार अशा हिंदी चित्रपटातून मारुतीराव परब यांनी विनोदी भूमिका साकारल्या होत्या. गुड्डी लहान असल्याने चित्रपटाच्या सेटवर आपल्या मुलीला घेऊन जायचे. गुड्डीचे खरे नाव ताहिरा परब पण बालपणापासूनच ती अतिशय गोंडस असल्याने तिला गुड्डी म्हणून हाक मारायचे. सेटवर तिला पाहून ही कोणाची मुलगी असे विचारायचे. तेव्हा मारुतीची मुलगी असे उत्तर मिळायचे. तेव्हापासून गुड्डी मारुती हेच नाव तिचे प्रचलित झाले. अशातच गुड्डीला चित्रपटात बालकलाकार म्हणून काम मिळाले. जान हाजीर है हा तिचा बालकलाकार म्हणून पहिलाच चित्रपट ठरला. त्यानंतर जाडेपणामुळे गुड्डीला चित्रपटातून विनोदी भूमिका मिळाल्या.
गुपचूप गुपचूप या मराठी चित्रपटातून गुड्डीने रोजीची भूमिका साकारली होती. अशोक सराफ आणि गुड्डी मारुती या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना मनमुराद हसवून गेली. मात्र त्यानंतर गुड्डीला हिंदी चित्रपटाने ऑफर देऊ केली. खिलाडी, शोला और शबनम, दुल्हे राजा, दिल तेरा दिवाना, पूलीसवाला गुंडा अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात गुड्डी विनोदी भूमिकेत चमकली. मधल्या काळात तिला हिंदी मालिकांमधून अभिनयाची संधी मिळाली. दरम्यान अशोक सोबत गुड्डी विवाहबंधनात अडकली. श्रीमान श्रीमती, डोली आरमानों की, ये उन दिनों की बात है, हॅलो जिंदगी या मालिकेत देखील ती सहाय्यक भूमिकेत दिसली. विनोदी सहाय्यक भूमिकेमुळे गुड्डी मारुती आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेली पाहायला मिळते.