मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता शेखर फडके हा नुकताच नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. गजरा मोहोब्बतवाला ह्या नाटकाचा शुभारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे पार पडला त्यावेळी शेखर फडकेला एक सुखद आणि तेवढाच अविस्मरणीय अनुभव मिळाला. शेखर फडके याने मराठी सृष्टीतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई पाहिजे या चित्रपटातून त्याने मराठी सृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. खलनायक, विनोदी भूमिका तसेच सहाय्यक भूमिका त्याने त्याच्या अभिनयाने नेहमीच सुंदररित्या वठवल्या आहेत. मात्र या प्रवासात त्याने दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले.
गजरा मोहोब्बतवाला या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. आनंद काळे, प्रज्ञा एडके, ऋतुराज फडके, किरण प्रधान अशी कलाकार मंडळी या नाटकातून महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. नाटक पाहिल्यानंतर एका दाम्पत्याने शेखर फडकेची आवर्जून भेट घेतली आणि या भेटीत शेखरला एक सुखद अनुभव मिळाला. हा अनुभव शेअर करताना शेखर म्हणतो की, हॅलो! आज एक आनंदाची बातमी शेअर करतोय. ५०० रुपयांची जी नोट दिसते आहे ती माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली आहे, तर का? ५ तारखेला, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर माझी कथा आणि माझं दिग्दर्शन असलेले नाटक “गजरा मोहब्बतवाला” ह्याचा शुभारंभ बालगंधर्व पुणे येथे झाला.
नाटक लोकांना खूप आवडलं, माझंही काम कथा आणि दिग्दर्शक म्हणून आवडलं. साधारण खरंतर नाटक संपल्यावर कलाकारांना भेटायला प्रेक्षक येतात. त्यांना प्रोत्साहन द्यायला; शाबासकी द्यायला. काल तर हे घडलेच, पण मलाही भेटले अनेकजण, कौतुक केलं दिग्दर्शक म्हणून. त्यातलेच एक पन्नाशीच्या वरचे साने काका काकू यांनी माझं, नाटकाचं कौतुक केलं. माझ्या खिशात ही ५०० ची अतिशय प्रेमाने, आणि हसत नोट कोंबली. तुझ्या कामाचं कौतुक आम्ही असंच करणार, नको म्हंटल्यावर, “वा” असं ओरडून म्हणाले. मायेने गालावर चापटी मारली आणि बाकीच्यांची पाठ थोपटवायला निघून गेले.
अर्थात मला हे जाम भारी वाटलं, आणि कौतुक ऐकून डोळ्यात टचकन पाणीही आलं. साने काका काकूंचे आभार. “बघायला सांगतो नाटक सगळ्यांना काळजी करू नकोस. तू अभिनय करत असलेले नाटक ही येऊ दे लवकर आता” असाही प्रेमळ सल्ला दिला. म्हणून म्हटलं एक दिग्दर्शक म्हणून मला पहिलं पारितोषिक मिळाले, ५०० रुपयांची ही नोट; आत्मविश्वास दुणावला. तुम्हींही लक्ष ठेवा आणि बघायला या आमचा हा “गजरा मोहब्बतवाला”. भरपूर एन्जॉय करा, ही गजऱ्याची जादुई हसरी सफर.