प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर श्वेता शिंदे ने देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. देवमाणूस म्हणजेच डॉ अजित कुमार देवच्या करस्थानांची मालिकाच यातुन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेत वेगवेगळ्या अभिनेत्रीची अर्थात सावजाची एन्ट्री होताना दिसते. आपले ध्येय्य साध्य झाले की डॉ त्या व्यक्तीचा नामोनिशाण मिटवून टाकण्यात आता चांगलाच पटाईत झाला आहे. अशातच त्याला साथ देणाऱ्या डिंपलने देखील निलमचा काटा काढून डॉक्टरला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डॉक्टरकडून आता तिला हिस्सा मिळाला आहे. निलमची भूमिका अभिनेत्री शिवानी घाटगे हिने चोख बजावलेली पहायला मिळाली होती.

मालिकेतून निकमच्या पात्राची एक्झिट झाल्यानंतर शिवानी भावुक झाली होती. निलमचा प्रवास संपतो न संपतो तोच आता सोनूची नव्याने एन्ट्री झाली आहे. ही सोनू गडगंज श्रीमंत असून आपल्या जागेच्या व्यवहारात अडचणी आल्याने ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. मात्र डॉक्टरची तिची भेट होत नसते अशातच बज्या सोनूला उचलून डॉक्टरकडे घेऊन येतो आणि तिच्यावर उपचार करायला सांगतो. या उपचारावर सोनू डॉक्टरचे आभार मानत त्यांना डॉक्टर अंकल म्हणते. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, डॉक्टर सोनूला त्याच्या जाळ्यात कसा ओढतो हे पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तूर्तास या सोनूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

देवमाणूस २ या मालिकेत सोनूची भूमिका साकारली आहे अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने. वैष्णवी कल्याणकर ही सोशल मीडिया स्टार आहे. नृत्यासोबतच वैष्णविला अभिनयाची विशेष आवड आहे. युट्युब वर वैष्णवीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील ज्यात ती हिंदी गाण्यावर एक स्टोरी सादर करताना दिसते. कडक शो च्या माध्यमातून ती विविध व्हिडिओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. धर्मा मुव्हीज क्रिएशन च्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसीरिजमध्ये वैष्णवीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजचे जवळपास ११ व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडीओमध्ये वैष्णवी झळकली आहे. वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातली. डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनय आणि नृत्याची आवड असलेल्या वैष्णवीने सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. यातूनच तिला झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली आहे. या मालिकेत ती सोनूची भूमिका साकारताना दिसत आहे. ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका असल्याने या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक आहे. वैष्णवी कल्याणकर हिला पहिल्या वहिल्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.