३ डिसेंबर रोजी “पांडू” चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कुशल बद्रिके आणि भाऊ कदम प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. दादा कोंडके यांची विनोदाची शैली अफाट होती. त्याचा उपयोग त्यांनी आपल्या चित्रपटात करून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आज मराठी सृष्टीत त्यांची कुठेतरी उणीव भासत असल्याने त्यांच्यावर अनुसरून झी स्टुडिओ प्रस्तुत पांडू हा चित्रपट विजू माने यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा ठरवले.
भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी हे कलाकार पांडू चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दादा परत या ना हसवा ना… हे चित्रपटातलं गाणं तुफान हिट ठरलेलं पाहायला मिळत आहे. अवधूत गुप्ते यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून अवधूत आणि आदर्श शिंदे यांनी ते गायलं आहे. हे गाणं आपल्या वाट्याला आल्यानंतर कुशल बद्रिकेने आपली इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. ‘मी मेल्यानंतर मीडिया कडे एक तरी गाणं वाजवायला असावं ज्यात मी आहे. असं मला कायम वाटायचं.’ असं एक जबरी गाणं दिल्याबद्दल त्याने अवधूत गुप्तेचे आभार मानले आहेत. मराठी सृष्टीत येण्यासाठी आणि जम बसवण्यासाठी कुशल बद्रिकेने अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. चला हवा येऊ द्या या शोमुळे कुशलला एक वेगळी ओळख निर्माण करता आली. बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, डावपेच, रंपाट, लूज कंट्रोल, स्लॅमबुक अशा चित्रपटातून त्याला अभिनयाची संधी मिळाली. मात्र प्रथमच तो पांडू चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे आणि चित्रपटातील दादा परत या ना या एका गाण्यामुळे त्याचे स्वप्न आता सत्यात उतरताना तो पाहत आहे.आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आपल्यासाठी मोलाचा आहे असे तो म्हणतो.
चला हवा येऊ द्या या मालिकेमुळे कुशल बद्रिके यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी श्रेया बुगडेने भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि ‘ही माझी कमाई’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम सारखी मित्र आपल्या आयुष्यात आपण कमावली आहेत असे श्रेयाचे म्हणणे होते. पांडू चित्रपट दोन दिवसांनी प्रदर्शित होत असल्याने या चित्रपटाची उत्सुकता कलाकारांना लागून राहिली आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकारांना भरभरून शुभेच्छा आणि हा चित्रपट हाऊसफुल्ल ठरो हीच एक सदिच्छा…