कलर्स मराठी वाहिनीवर ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही मालिका दोन बहिणींच्या संघर्षाची कहाणी होती. रश्मी अनपट हिने ईश्वरीचे मुख्य पात्र साकारले होते. सुहृद वर्डेकर, श्वेता मेहंदळे, संयोगीता भावे, शैलेश दातार असे बरचसे जाणते कलाकार या मालिकेला लाभले होते. मालिकेत बालपणीची ईश्वरी बालकलाकार मृण्मयी सुपाळ हिने साकारली होती. मृण्मयीची बालकलाकार म्हणून ही पहिलीच टीव्ही मालिका होती. या मालिकेनंतर मृण्मयी अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे.
ब्लॅक बोर्ड, आब्रो, तू माझा सांगाती, बंपर लॉटरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा, रेडू या आणि अशा अनेक चित्रपट तसेच मालिकेतून मृण्मयीने बालकलाकार म्हणून मुख्य भूमिका बजावल्या आहेत. तू माझा सांगाती या मालिकेत तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणजेच अवलीची भूमिका साकारली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गाथा या मालिकेतून तिला रमाबाईंची महत्वाची भूमिका मिळाली. मृण्मयी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. कीर्ती डोंगरसी कॉलेजमधून ती आपले शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणासोबतच मृण्मयीला अभिनय क्षेत्राची ओढ लागली आणि लहानपणापासूनच तिने मालिका क्षेत्रात जम बसवण्यास सुरुवात केली.
मालिकांमधून मुख्य नायिकांच्या बालपणीची भूमिका तिला मिळत गेल्याने मृण्मयी प्रसिद्धीच्या झोतात आली. यादरम्यान उत्कृष्ट अभिनयाची विविध पारितोषिकं तिने पटकावली. काही वर्षांपूर्वी व्हीक्सची एक जाहिरात आली होती. गौरी सावंत आणि त्यांच्या मुलीचा जीवनप्रवास या जाहिरातीत दाखवण्यात आला होता. या जाहिरातीत गौरी सावंत यांच्या मुलीची भूमिका मृण्मयीने बजावली होती. या जाहिरातीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले होते. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला मालिकेतील बालपणीची मृण्मयी आणि आताची मृण्मयी यांच्यात खूप फरक जाणवतो. ही चिमुरडी आता अधिकच सुंदर दिसत असून लवकरच मृण्मयी मालिकेतून नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळो हीच एक सदिच्छा.