स्टार प्रवाह वाहिनीवर “जय भवानी जय शिवाजी” हि मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावत आहे. महाराजांच्या शिलेदारांवर प्रकाश टाकणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडलेल्या दिसल्या या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांना खंबीरपणे साथ देणारे आणि पावनखिंडित शत्रूंना थोपवून ठेवणारे बाजीप्रभू देशपांडे पाहायला मिळाले मालिकेत त्यांचा प्रवास थांबला असल्याने यापुढे ही भूमिका निभावणारे अभिनेते अजिंक्य देव मालिकेतून दिसणार नाहीत म्हणून भूषण प्रधान खूपच भावुक झालेला दिसला.
अजिंक्य देव यांच्या प्रति त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे त्यात तो म्हणतो की, पावनखिंड इतक्यात नको… पुढे जाइल तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला.. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूटचा दिवस आठवतो. नुकताच टायफॉईडच्या तापातनं उठून शूट ला गेलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा प्रोमो. त्या दिवशी अजिंक्य देव ह्यांना भेटलो… पहिलीच भेट! संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. सर – अजिंक्यजी, असे काही पर्याय न देता भेटताक्षणी तो अजिंक्य दादा झाला! प्रोमो शूट संपले… आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार! अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची. एरवी खूप बोलणारा मी लॉकडाउन नंतर जरा कमी बोलायला लागलोय (कदाचित). पण दादा आणि मी सेट वर असलो आणि वेळ मिळाला की बोलावेसे वाटायचे, शेअर करावेसे वटायचे. एक उत्तम श्रोता (listener)… शांत आणि खरा स्वभाव, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड. Fit & fine and a thorough gentleman. आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हासतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही…
आणि अनुभवी असूनही प्रचंड मेहनती! ५ महिन्यांचा त्याचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला. ५ महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार हया विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय.. ‘घोडखिंडीत (पावनखिंडीत) बाजी प्रभू देशपांडे ह्यांना गमवल्यानंतर राजांना काय वाटले असेल’! छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून… पण ओलावा जपून! अजिंक्य दादा, लवकरच भेटू… नवीन भूमिकेत आणि आपापल्या भूमिकेतही!