आजच्या या घावपळीच्या जगात पोट दुखेपर्यंत हसायला मिळणे खरंच खूप महाग होऊन बसले आहे. टेलिव्हिजन वरील विनोदी मालिकांमध्ये सर्वात जास्त चर्चा असेल तर ती महाराष्ट्राची हास्यजत्रेची. सूत्रधार आणि मनसोक्त दाद देणारी हसतमुख प्राजक्ता माळी तसेच परीक्षक म्हणून लाभलेली बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल साई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक, सोबत विनोदवीर कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर..
तसेच मॅड कॉमेडीचा डॅडी पंढरीनाथ कांबळे, टेन्शनचे भूत पळवणारे अरुण कदम, खानदेश सुपुत्र श्याम राजपूत, लॉलीचा मॅडनेस नम्रता संभेराव, एव्हरग्रीन भिडू भूषण कडू, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खड्कपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी, भांडुपचा शशी कपूर निखिल बने, वन अँड ओन्ली दत्तू मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा रवी वासवानी ओंकार राऊत, कोकण कोहिनुर ओंकार भोजने, एनर्जेटिक आशिष पवार आणि हास्य महारथी “समीर चौगुले”. विनोदाला लीलया अंगा खांद्यावर नाचविणाऱ्या या कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या हृदयात हक्काचे स्थान तयार केले आहे. ‘फू बाई फू’,’कॉमेडीची बुलेट ट्रेन’ यांच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले. विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली. कुठून कुठून रचलेली तुफानी स्क्रिप्ट आणि समीरचा सॉलिड अभिनय या शोची खासियत.
विनोदांनी मंचावर उडणारे हास्याचे बार यासाठी कमालीची लकब आणि चार्लीची याद देणारा अभिनय, डोक्याचा चंद्र चमकत असताना आपल्या टकलेचं हसू करून प्रेक्षकांच्या नजरेचा स्वतःचा अभिनय उंचावणारा बहारदार ऍक्टर. या जत्रेची टीम कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटायला गेली. भेटी दरम्यान समीरने अमिताभच्या पाया पडण्याची इच्छा जाहीर केली, पण क्षणाचाही विलंब न करता अमिताभ स्वतः समीरच्या पाया पडण्यास झूकू लागले. हा प्रकार पाहून समीर सहित सेटवरील सर्वजण गोंधळले. यावर अमिताभ म्हणाले, “आप तो ऍक्टिंग मे जिनियस हो.. झुकना तो मुझे चाहिए !” छोट्या पडद्यावरील या भन्नाट विनोदी मालिकेने रसिक जणांचे खळखळून मनोरंजन केले. समीरला अभिनयाची हास्यजत्रा खुलवायला मुहूर्त लागत नाही हे अगदी खरं. आज शहनशाह झुकला असला तरी झुकताना स्वप्रतिमेची उंची आभाळापर्यंत घेऊन जात मराठमोळ्या समीरला शहनशाहचा सोनेरी मुकुट चढवून गेला.