मराठी बिग बॉसच्या घरात दोन दिवस चाललेला खुल्ला करायचा राडा हा टास्क जोरदार गाजला. या टास्कमुळे बिग बॉसच्या शोला मोठा टीआरपी मिळाला. किरण माने, विकास सावंत हा टास्क खूप चांगला खेळले त्यावरून त्यांचे कौतुकही करण्यात आले. खुडूक कोंबडी पिसाळली विक्या हा किरणचा डायलॉग मात्र अनेकांनी उचलून धरला. या राड्यामुळे अनेक मिम्स बनवण्यात येऊ लागले आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले. जेव्हा बी टीमने हा टास्क खेळला तेव्हा अपूर्वा नेमळेकर आपल्या टीमच्या सदस्यांना सपोर्ट करताना दिसत होती. प्रसाद आणि अमृता धोंगडेच्या खेळीमुळे अपूर्वा खूपच चिडली होती.

एक दोन वेळेस प्रसादला तिने सूचक ईशारा देखील दिला. प्रसाद आक्रमक झाल्याचे पाहून बिग बॉसने त्याला तसे करण्यास मज्जाव घातला होता. अर्थात या सर्वांमधून एक सदस्य मात्र अतिशय शांत आणि संयमी राहून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करताना दिसली. ती सदस्य म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी. तेजस्विनी बिग बॉसच्या घरात दाखल झाली त्यावेळी तिचे आणि त्रिशूलचे प्रेमाचे सूर जुळतायेत का असे चित्र सगळ्यांच्या समोर आले होते. दोघांमधील संवाद वाढू लागले ते एकमेकांशी गप्पा मारू लागले, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये अशीच चर्चा रंगलेली दिसली. मात्र कालांतराने हे दोघे केवळ मैत्रिपुरतेच एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. दरम्यान समृद्धी आणि त्रिशूलची जवळीक वाढल्यानंतर तेजस्विनीने या चर्चेतून काढता पाय घेतला.

बिग बॉसच्या घरात आल्यापासून तेजस्विनी प्रत्येक कार्यात सहभाग घेते. एवढेच नाही संचालक पदी असतानाही तिने ही जबाबदारी नेटाने पार पाडली. तेजस्विनी ही अतिशय संयमी खेळाडू आहे; हे या घरात प्रकर्षाने जाणवते. जिथे किरण माने यांनी बडबड, एकमेकांना नावं ठेवणं असो किंवा अपूर्वाचा चढता आवाज, प्रसादचा आक्रमकपणा असो; या सर्वांमध्ये तेजस्विनी काहीशी वेगळी जाणवते. शिस्तीत खेळणे, संयम राखणे, बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि सर्व टास्क मन लावून खेळणे. एवढेच नाही तर फेअर अनफेअर गोष्टी समजून सांगणे. विकासला टास्क दरम्यान झालेला त्रास जाणून घेणे या सर्व गोष्टी समजून घेऊन तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात जागा तयार केली आहे.
त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या सिजनची विनर कोण असेल तर ती तेजस्विनी असावी असा शिक्कामोर्तब प्रेक्षकांनी तिच्या नावापुढे केलेला पाहायला मिळतो आहे. बिग बॉसच्या घरातील बहुतेक सदस्य हे रडुबाई सारखे वागताना दिसले आहेत. अपूर्वा, अमृता यांचा वरचढ आवाज देखील प्रेक्षकांना नकोसा वाटत आहे. मात्र तेजस्विनी रडुबाई मुळीच नाही हे इतक्या दिवसांच्या प्रवासात प्रेक्षकांनी अनुभवले आहे. कुठलाही आरडा ओरडा न करता, आवाज चढवून न बोलता तिने सर्व टास्क संयमाने खेळले आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या सिजनची विनर तेजस्विनी असावी असे अनेकांचे म्हणणे आहे.