बिग बॉसच्या घरात सध्या प्रेमाच्या आठवणींचे वारे वाहू लागले आहेत. इतके दिवस घरात होणाऱ्या वादा वादीमुळे अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, प्रसाद जवादे हे सर्व जण आपल्या आवाजामुळे घर डोक्यावर घेत होते. प्रत्येक टास्क दरम्यानचे वाद हे ठरलेले गणित असताना एक विरंगुळा म्हणून घरात कॉलेज लाईफच्या गमती जमती एकमेकांसोबत शेअर करत आहेत. घरातील सदस्य आपल्या कॉलेजच्या आठवणी सांगताना कधी प्रेमात पडलो. प्रपोज कसं केलं याबाबत खुलासा करत आहेत. किरण माने, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, विकास सावंत या सर्वांनी आपल्या प्रेमाची गोष्ट इथे आवर्जून सांगितली.
तेजस्विनीने फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले, त्यावेळी तिचे वर्गमित्र बरेचसे इराणी होते. तेजस्विनी देखील दिसायला तशीच असल्याने तिने देखील मी इराणीच आहे असं सर्वांना सांगितले होते. त्या मित्रांपैकी एकाने तेजस्विनीच्या घराबाहेर जाऊन प्रपोज केले होते. आई वडिलांना कळल्यावर गोंधळ होईल म्हणून मी इराणी नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. किरण माने यांनी देखील कॉलेजचा एक किस्सा सांगितला. १९८८ साली किरण माने यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी गावातून साताऱ्यात आल्यावर अनेक कॉन्व्हेंट मधल्या मुली शिकायला होत्या. त्यातलीच एक देखणी मुलगी किरण माने यांना आवडू लागली. कॉलेजच्या नाटकात एकत्रित काम करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. मात्र तिला प्रपोज कसं करायचं म्हणून ते खूप घाबरत होते.
शेवटी मित्राने सायकलवर जाऊन तिला थांबवले आणि किरण लव्हस यु असे म्हटले. तेव्हा ही नोज मी असे म्हटल्यावर तिने किरणला नकार दिला. असा त्यांच्या मित्राने चुकीचा समज करून घेतला आणि हे किरणला जाऊन सांगितले. त्यानंतर मात्र त्या मुलीचा विषय किरण माने यांनी सोडून दिला. पण दहा बारा दिवसांनी जेव्हा त्या मुलीने किरणबद्दल पुन्हा विचारलं. तेव्हा तो तिचा नकार नव्हता हे त्याला त्यावेळी समजलं. अर्थात हे प्रेमप्रकरण पुढे सरकलेलं नसलं तरी किरण माने यांच्या मित्राच्या गोंधळामुळे बिग बॉसच्या घरात एकच हशा पिकला. प्रसाद जवादे याने देखील आपल्या कॉलेजचा किस्सा सर्वांसोबत शेअर केला. तेव्हा वर्गातली एक मुलगी दिसायला खूपच सुंदर होती त्यामुळे सगळ्या मुलांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या. मात्र तिच्याबरोबर बोलायचं धाडस कोणीही केलं नव्हतं.
कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही मुलींशी फारसं बोलत नव्हतो, असे तो आवर्जून म्हणतो. पण काहीही करून त्या मुलीला प्रपोज करायचं हे धाडस त्याने पेलण्याचं ठरवलं. पण लाजऱ्या स्वभावामुळे त्याने त्याच्या एका मित्राला ही गोष्ट सांगितली. मित्राने ही गोष्ट त्या मुलीला जाऊन सांगितली तेव्हा, हे बोलायला तो का नाही आला! तो जर हे बोलू शकत नाही तर तो कधी काय करू शकणार आहे? असा प्रश्न तिने उपस्थित केला आणि प्रसादच्या प्रपोजलला तिने स्पष्ट नकार दिला होता. आयुष्यातील पहिलं प्रपोजल ज्याला मला नकार मिळाला होता अशी आठवण त्याने यावेळी सर्वांना सांगितली.