काही दिवसांपूर्वी भरत जाधव यांनी रत्नागिरी मध्ये जाऊन तू तू मी मी नाटकाचा प्रयोग सादर केला होता. पण नाट्यगृहाची अवस्था पाहून इथून पुढे रत्नागिरीत पाऊल ठेवणार नाही असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना हात जोडून माफी मागितली. खरं तर नाट्यगृहात एसी आणि साउंड सिस्टिमची दुरवस्था झाली होती. एवढ्या प्रचंड उकड्यात नाटकाचे प्रयोग कसे करावेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. बिघडलेल्या साउंड सिस्टीममुळे प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता. अशात प्रयोग कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांनी प्रेक्षकांच्या समोर मांडला. ही तक्रार सांगत असताना भरत जाधव म्हणतात की, एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा.
तुम्ही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत हात जोडत ते म्हणाले की, मी पुन्हा रत्नागिरीत प्रयोग करणार नाही. भरत जाधव यांच्या आधी अनेक कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान होत असलेल्या त्रासाबद्दल आणि नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर मते मांडली आहेत. काही दिवसांपूर्वीच वैभव मांगलेने देखील नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यात त्याने म्हटलं होतं की नाशिकच्या नाट्यगृहातील एकाही ठिकाणाची वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात प्रयोग पाहत होते. नाट्य गृहांच्या या दुरावस्थेबाबत कित्येकदा कलाकारांनी आवाज उठवला आहे.
नाट्यगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो त्याबद्दलही कोणीच काही पुढाकार घेत नाही. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकांना देखील हा त्रास सहन करावा लागतो. नाट्यगृहात मनोरंजन ऐवजी होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा प्रेक्षक तसेच कलाकार मंडळींनी कायम मांडला आहे. तरीही आज तागायायत यावर समाधानकारक उपाययोजना झालेली नाही. यात नामांकित नाट्यगृहही असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नुकतेच प्रशांत दामले यांची आखील भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. आणि त्यांनी येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रातील नाट्यगृहांबाबतच्या तक्रारिंचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कलाकारांच्या या तक्रारींचे लवकरच निरसन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.