ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या नीरज चोप्राने त्याच्या आई आणि वडिलांना पहिल्यांदाच स्वकमाईने विमान प्रवास घडवून आणला होता त्यावेळी ‘माझे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले’ अशी भावनिक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. नीरज चोप्राची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. इतके मोठे यश मिळवलेला हा खेळाडू आजही इतका साधा कसा याचे कौतुक अनेकांनी केलेले पाहायला मिळाले. नीरज चोप्राच्या या पोस्टमुळे अभिनेता भरत जाधव यांनी देखील असाच एक अनुभव शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. पहिल्यांदाच आई वडिलांचा विमानप्रवास कसा घडला याचा किस्सा त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये सांगितला आहे.. आपल्या पोस्टमध्ये ते नेमके काय म्हणाले ते पाहुयात…
“आई वडिलांना पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून आणल्याची काल नीरज चोप्रा ची पोस्ट पाहिली आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आमचं मूळ गाव कोल्हापूर. गावी बऱ्याचदा येणं जाण असायचं. परंतु आमचं तिथे घर नसल्यामुळे नातेवाईकांकडे मुक्कामाला असायचो. सिनेमातील माझं करिअर चांगलं मार्गी लागल्यावर आई वडिलांनी गावी (कोल्हापूर) एखाद छोटसं घर घेऊन दे असं सांगितलं. आई वडिलांनी आयुष्यभर खुप कष्ट केले होते. चैन आणि सुख सोई खुप उशिरा त्यांच्या आयुष्यात आल्या. मग आई वडिलांसहित संपुर्ण जाधव कुटुंबाला एक सरप्राईज देण्याचा विचार केला. कोल्हापुरात एक प्रशस्त मोठा बंगला विकत घेतला. कोणालाही सांगितलं नव्हतं. सिनेमाच्या निमित्ताने आपला कायम विमान प्रवास होत असतो पण आपल्या आई वडिलांचा आणि घरच्यांचा कधी होणार हा ही विचार नेहमी मनात असायचा.”
भारत पुढे म्हणतो.. “म्हणून शेवटी एक फ्लाईट बुक केली ज्यात मी, आई वडील, माझे भाऊ त्यांच्या फॅमिली असा संपुर्ण जाधव परिवार विमानाने कोल्हापूरला दाखल झालो. विमानतळावरून एक मोठी बस केली होती त्या बसने सर्वांना आमच्या नव्या घरी घेऊन गेलो आणि आई ला दाखवलं ‘हे आपलं नवीन घर..!!” आपल्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान दिसणं हेच खरं सुख. साध्या सरळ भरत जाधवचा आपल्या आई वडिलांच्या आणि एकत्र कुटुंबासाठीची आपुलकी प्रेम खूप काही शिकवून जातो.