मराठमोळ्या घरात दिवाळी सणाची लगबग सुरु झाली की संपूर्ण घरात घमघमाट असतो फराळाचा, अस्सल मराठी चवीच्या रुचकर चटकदार गोड तिखट लाडू करंज्या चकल्यांचा. याच स्वादिष्ट पक्वानांचा सुंगध साता समुद्रापार घेऊन जाणारा खाद्य प्रवर्तक आणि हि अचाट कल्पना कोट्यावधींच्या बिझनेस मध्ये रूपांतरित करणारा अवलिया उद्योजक सचिन गोडबोले. दिवाळी फराळ एक्स्पोर्ट केला जाऊ शकतो हि भन्नाट कल्पना सचिन यांना अतुल परचुरे यांच्या एका नाटकातील संवादापासून सुचली, डायलॉग होता “इंस्टंट इडली, इंस्टंट ढोकळा, कुणीतरी रुचकर कांदेपोहे तरी द्या ना!”

तब्ब्ल २० वर्षांपूर्वी सुचलेल्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला सचिनच्या आई सुमती दिनकर गोडबोले यांनी. अद्ययावत सुविधा असलेलं दादर येथे मराठी माणसाचं घरगुती पदार्थांचं गोडबोले स्टोअर्स त्याने उभे केले. बघता बघा काही हजारांचा बिझनेस त्याने कोट्यवधींच्या उलाढालीत रूपांतरित केला. त्यांच्या दिवाळी फराळाला तर चक्क परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. अगदी जेव्हा लग्न होऊन माधुरी दीक्षित परदेशात स्थायिक झाली होती त्यावेळी तिच्या घरी गोडबोलेंचाच फराळ पोहचत असे. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना मराठी मातीत तयार झालेला अस्सल घरगुती चवीचा फराळ मिळाल्याचे समाधान वाटते. म्हणतात ना कोणतेही काम छोटे नसते, फक्त आपण ते कश्याप्रकारे लोकांसमोर मांडून आपला व्यवसाय चालवतो ह्याला खरंच महत्व असते.. हेच करून दाखवणाऱ्या सचिन गोडबोले यांची तरुण मराठी उद्योजकांनी प्रेरणा घ्यायला हवी.
