गेल्या महिन्यात १२ मार्च रोजी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यावेळी भाग्यश्रीच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचा पुण्यात संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. मात्र यावर कुठलीही शहानिशा होत नसल्याने माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या अशी मागणी तिने केली आहे. मधू मार्कंडेय हिच्या निधनाआधी तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांची दोन्ही मुलांची जबाबदारी भाग्यश्रीने घेण्याचे आश्वासन मृत बहिणीला दिले आहे. मात्र महिना उलटूनही आपल्या बहिणीला न्याय मिळाला नसल्याने भाग्यश्री यावर गंभीरपणे मत मांडले आहे.
घटनेची तपशीलवार माहिती देताना भाग्यश्री म्हणते की, नमस्कार हे घाबरविण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाही. अंतःकरणातून फक्त सत्य मांडण्याचा प्रयत्न आहे. १२ मार्च रविवारी २ च्या सुमारास माझी बहीण सामान घेऊन केक वर्कशॉप करण्यासाठी बाहेर पडली. तिला ३ ते ४ महिन्यांपासून ओळखत असलेल्या महिलांसोबत बनवलेले केक बेस घेऊन गेली. आमच्या माहितीप्रमाणे तिला ५ महिलांसह वर्कशॉप घ्यायचे होते. आता त्याच स्त्रिया सांगत आहेत की त्या रस्त्यावर एक गाळा शोधत बाहेर पडल्या. संबंधित मालकाशी अर्धा तास संभाषण करून जागेविषयी बोलणी करीत होत्या. अचानक माझी बहीण खाली पडली आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. हृदयाचे ठोके जाणवत नसल्याचे पाहून खाजगी दवाखान्याने तिला दाखल करून घेतले नाही.
नंतर वायसीएम रुग्णालयात पोहोचल्यावर तिला मृत घोषित केले. एक तासापूर्वी, माझी बहीण सर्व काही तयारी करून ठरवलेल्या ठिकाणी कार्यशाळेसाठी गेली होती याचा स्पष्ट पुरावा आहे. एक दिवस आधी तिला त्यासाठी आगाऊ रक्कम देखील मिळाली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिथे जे काही घडले ते पूर्णपणे संशयास्पद आहे. माझी बहिण जिथे गेली होती ते ठिकाण खूपच कमी वर्दळीचे आहे. संपूर्ण परिसरात कुठेही सीसीटीव्ही देखील नाही. माझ्या बहिणीने व्यवसायासाठी एक कार्यालय आरक्षित केले ज्याचे भाडेही भरले होते. आर्थिक मदतीसाठी तिने प्रथम वर्कशॉपची ऑर्डर घेतली. इतके स्पष्ट पुरावे मिळूनही इतके दिवसा नंतरही संबंधितांवर ठोस कारवाई का झाली नाही हे मला समजत नाही.
शिवाय दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे मी संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागते आहे. भाग्यश्री यासंदर्भात असेही म्हणते की, जे पोस्टमोर्टम रिपोर्ट मिळाले आहेत त्यातही काहीच स्पष्ट सांगितले नाही. शिवाय पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासही नकार दिला आहे. यासाठी कुठलेही ठोस कारण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहिणीला न्याय मिळावा अशी ती मागणी करत आहे.